गणेशभक्तांना हवा नाशिकरोड कारागृहातीलच विघ्नहर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:39 AM2017-08-11T00:39:15+5:302017-08-11T00:39:15+5:30
सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडूमातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये कारागृहात बनविलेल्या शाडूमातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. शंभर टक्के इको फ्रेन्डली मूर्ती म्हणून कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या मूर्ती भक्तांच्या पसंतीस पडत आहेत. म्हणून या मूर्तींची मोठी नोंदणी झाली असून, असंख्य मूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत.
नाशिक : सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडूमातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये कारागृहात बनविलेल्या शाडूमातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. शंभर टक्के इको फ्रेन्डली मूर्ती म्हणून कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या मूर्ती भक्तांच्या पसंतीस पडत आहेत. म्हणून या मूर्तींची मोठी नोंदणी झाली असून, असंख्य मूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत.
नाशिकरोड कारागृहात सागर पवार हा पेणमधील कारागीर सध्या शाडूमातीच्या अतिशय रेखीव मूर्ती तयार करीत आहेत. सागरच्या कलासक्त हातातून घडलेल्या मूर्ती माध्यमांसमोर आल्यानंतर या मूर्तींना राज्यातील इतर कारागृहातून मागणी होत आहेच, शिवाय नाशिककरांनीदेखील या मूर्तींची मागणी नोंदविली आहे. मागणी प्रचंड असली तरी केवळ दोनशे ते अडीचशे इतक्याच मूर्ती बनविण्यात येणार असून, या मूर्ती कारागृहाच्या प्रदर्शन स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. बघताच क्षणी कुणाच्याही नजरेत भराव्यात, अशा यामूर्ती आकर्षक शैलीतील आहेत. अफलातून कल्पनाशक्तीने या मूर्तींना आकार देण्यात आलेला असून, इतरत्र कोठेही अशा मूर्ती शक्यतो दिसत नाहीत. त्यामुळेच या मूर्ती बघण्यासाठी आणि घेणाºयांचीही संख्या वाढली आहे. अनेकांनी कारागृह प्रशासनाला मूर्ती बनवून देण्याची मागणी नोंदविली, मात्र ठरविल्यापेक्षा जास्त मूर्ती बनविणे शक्य नसल्याने नोंदणी स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.