गणेशोत्सव झाला आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:51 AM2019-09-01T00:51:33+5:302019-09-01T00:51:50+5:30
गणेशोत्सव आला की घरोघरी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. सध्या आॅनलाइन खरेदीचा काळ असल्यामुळे गणेशोत्सव यातून मागे कसा राहील? यामुळे सध्या आॅनलाइन खरेदीच्या अॅपवर गणेशोत्सवासाठी विशिष्ट विभाग तयार झालेला दिसून येत आहे.
नाशिक : गणेशोत्सव आला की घरोघरी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. सध्या आॅनलाइन खरेदीचा काळ असल्यामुळे गणेशोत्सव यातून मागे कसा राहील? यामुळे सध्या आॅनलाइन खरेदीच्या अॅपवर गणेशोत्सवासाठी विशिष्ट विभाग तयार झालेला दिसून येत आहे. तसेच यांसारख्या अॅपवर गणेशोत्सवाच्या वस्तंूची खरेदी करताना दिसून येत आहे.
गणपती उत्सव आला की खरेदीला बाजारात तुडुंब गर्दी होत असते. त्यात बाजारात येऊन पार्किंगची व्यवस्था नसते त्यामुळे पायी घरापासून बाजारात यावे लागत असल्यामुळे आता मात्र एका क्लिकवर आपण घरबसल्या ही सर्व खरेदी करू शकतो. आॅनलाइनवर गणेशोत्सवाचा स्वतंत्र्य विभाग सुरू झाला आहे. यामध्ये ग्राहकांना मखर, फ्लस्टिकचे फुले, सजावठीचे साहित्य, विद्युत रोषणाईच्या माळा यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर ग्राहक करत आहे. आजकालची तरुणाई आॅनलाइन खरेदीला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे.
चायनीज साहित्याची
खरेदी घटली
विद्युत रोषणाईचे साहित्यांना या काळात मोठी मागणी असते. अनेक वर्षांपासून बाजारात चायनीज रोषणाईचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत होते. पण यावर्षी चायनीजच्या वस्तुंमध्ये मोठी घट झालेली बघायला मिळत आहे.
सध्या रोषणाईच्या साहित्यांमध्ये भारतीय उत्पादन असलेल्या वस्तूंना मोठी मागणी मिळत आहे. अनेक वर्षांपासून बाजारात चायनीज वस्तूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. पण नागरिकांमध्ये झालेली जनजागृती व अशा वस्तुंवर काही प्रमाणात टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे या वस्तू भारतीय बाजारपेठेतून कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही अशा वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
बाजारात खरेदीसाठी दरवर्षीप्रमाणे मोठी गर्दी बघायला मिळत होती. त्यामुळे बाजारात येऊन खरेदी करण्यास जमत नसल्यामुळे सहज आॅनलाइन साहित्य बघण्यास सुरुवात केली असता यावर गणेशोत्सवाचा स्वतंत्र विभाग दिसला. यामध्ये मला जवळपास सगळेच साहित्य उपलब्ध झाले. त्यामुळे गणेशोत्सवाची मूर्ती वगळता सर्वच खरेदी आॅनलाइन पद्धतीने केली. त्यामुळे आजच्या काळात खरेदीचा हा उत्तम पर्याय आहे.
- अनिल सोनवणे
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चायनीज रोषणाईचे साहित्यांची घट झाली असून, भारतीय उत्पादन असलेल्या साहित्यांची मागणी ग्राहक करत आहे. नागरिकांकडून अशा वस्तूंना मागणी वाढल्यामुळे आम्ही यावर्षी चायनीज उत्पादने कमी करून स्वदेशी साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवले आहे. तसेच चायनीजच्या तुलनेत भारतीय वस्तूंचे दर जवळपास सारखेच झाले आहे.
- चेतन पाटील, विक्रेता