राजकीय हस्तक्षेपानंतर गणेश गिते यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:56 AM2019-01-05T00:56:37+5:302019-01-05T00:57:05+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या दोन जागा भरण्यासाठी शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याचे पाहून तब्बल चार तास खल करूनही अंतिम निर्णय होऊ शकला नाही, ही निवड नियम व निकषावर होणार असल्याचे वारंवार बॅँकेकडून सांगण्यात येत असताना अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यात हस्तक्षेप केल्याने भाजपाचे नगरसेवक गणेश गिते यांची वर्णी लावण्यात आली.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या दोन जागा भरण्यासाठी शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याचे पाहून तब्बल चार तास खल करूनही अंतिम निर्णय होऊ शकला नाही, ही निवड नियम व निकषावर होणार असल्याचे वारंवार बॅँकेकडून सांगण्यात येत असताना अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यात हस्तक्षेप केल्याने भाजपाचे नगरसेवक गणेश गिते यांची वर्णी लावण्यात आली.
या संदर्भातील राजकीय व आर्थिक तडजोडी, संचालकांची मनधरणी एका हॉटेलमध्ये करण्यात आल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेत बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी निवडीची घोषणा केली. दरम्यान, मालेगाव तालुका गटातून दाखल झालेले चारही अर्ज छाननीत अपात्र ठरल्याने तेथील सदस्याची निवड स्थगित करण्यात आली.
जिल्हा बँकेचे माजी संचालक अपूर्व हिरे (ओबीसी गट) व अद्वय हिरे (मालेगाव तालुका गट) यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिल्याने दोन्ही जागा भरण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने बँकेला आदेश होते. त्यासाठी दि. १ ते २६ डिसेंबर २०१८ दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. दोन रिक्त जागांसाठी एकूण १२ अर्ज प्राप्त झाले होते. दोन संचालकांच्या निवडीसाठी जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची विशेष बैठक शुक्रवारी दुपारी १२ वाजता बोलविण्यात आली.
या बैठकीत सदर अर्जाची छाननी करण्यात आली. मालेगाव अ वर्गसाठी पोपटराव पवार, महेंद्र ठोके, सुनील शेवाळे, संजय उगले यांचे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, छाननीत चारही अर्ज बाद ठरविण्यात आले. चारही अर्ज बाद ठरल्याने ही जागा निरंक राहिली. क वर्ग ओबीसी गटासाठी १२ अर्ज प्राप्त झाले होते. यात नंदकिशोर खैरनार, भाऊसाहेब पवार, गणेश गिते, विजय देसाई, विजय पगार, प्रमोद बच्छाव, राजेंद्र डोखळे, सुनील बागुल यांचा समावेश आहे. झालेल्या अर्ज छाननीत यातील सुनील बागुल यांचा अर्ज अपात्र ठरला. त्यामुळे सात नावांवर चर्चा करण्यात आली. तथापि, नावाबाबत एकमत होत नसल्याने काही संचालकांमध्ये मतभेद झाले व त्यातूनच माणिकराव कोकाटे यांनी बैठकीतून सभात्याग केल्याचे सांगण्यात आले. त्यास दुजोरा मिळू शकला नाही.
अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करून गणेश गिते यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ही निवड झाली असून, कोणत्याही संचालकांचा त्यास विरोध नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक शिरीष कोतवाल, संदीप गुळवे, धनंजय पवार, गणपतबाबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ उपस्थित होते.
संचालकांमध्ये वादावादी
संचालकमंडळाच्या बैठकीत एकमताने निवड झाल्याचा दावा केला जात असला तरी, या निवडीवरून संचालक मंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा रंगली आहे. बैठकीत एकमत न झाल्याने एका तारांकित हॉटेलमध्ये काही संचालक गेले व एकमेकांची समजूत काढत असतानाच प्रकरण हमरी-तुमरी व शिवीगाळपर्यंत पोहोचल्यामुळे काहींना हस्तक्षेप करावा लागला.
संचालक निवडीत घोडेबाजाराची चर्चा
जिल्हा बॅँकेच्या दोन संचालकांची निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच, त्यासाठी राजकीय दबाव व आर्थिक पूर्तता करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अध्यक्ष केदा अहेर यांनी संचालकांची निवड नियम व निकषानुसारच होईल, असा छातीठोक दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात शुक्रवारी एकाही नावावर एकमत होत नसल्याने त्यात राजकीय हस्तक्षेप तर झालाच, परंतु ३५ लाख रुपयांची देवाण-घेवाण झाल्याची उघड उघड चर्चा सहकार वर्तुळात रंगली. या आर्थिक उलाढालीत संचालकांचाही ‘वाटा’ ठरवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले, तर संचालकांच्या स्पर्धेत असलेल्या व डावललेल्या उमेदवारांना निवडीपूर्वी काही दिवसांअगोदर मध्यस्थांकरवी ‘निरोप’ पाठवून चाचपणीही करण्यात आली व त्यास नकार देणाºयांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.