येवल्यात गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली
By admin | Published: August 31, 2016 10:28 PM2016-08-31T22:28:37+5:302016-08-31T22:35:12+5:30
येवल्यात गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली
येवला : शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. लहान-मोठी गणेशमूर्तींची दुकाने सजली आहेत. मूर्तिकार श्रींच्या मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत तर उल्लेखनीय म्हणजे यंदा इको फ्रेंडली (पर्यावरणाशी सुसंगत) गणेशमूर्तीची मागणी वाढली आहे.
गणेशमूर्ती विक्र ीसाठी नेण्यापूर्वी कारागीर रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात व्यस्त असून, शहरातील गणेश मंडळाचे मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशमूर्ती तयार करण्याची व तयार मूर्तीची बुकिंग करून स्थापनेच्या दिवशी मूर्ती आणण्याचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीचा दिवस करीत गणेशमूर्ती तयार करण्यात व्यस्त असलेले कारागीर अखेरचा हात मारून रंगरंगोटीचे काम पूर्ण करीत आहेत. शहरातील नगर -मनमाड रोडवरील कलासागरमधील कलाकार अजय परदेशी यांचे अवघे कुटुंब गणेशमूर्ती, तसेच महालक्ष्मीच्या आकर्षक मुखवटे तयार करतात. येथील परदेशी कुटुंबीय मूर्ती तयार करतात. त्यांच्याकडे शहरातील बऱ्याच गणेश मंडळांनी मूर्तीसाठी आॅर्डर दिली आहे. तसेच घरगुती पूजनासाठी ते छोट्या गणेशमूर्ती विक्र ीसाठी उपलब्ध करतात. यावर्षी मल्हार, लालबागाचा राजा, मयूरेश्वर आदींसह अष्टविनायकाच्या रूपातील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. यात एक फुटापासून पाच फुट उंचीपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. येवला शहर व ग्रामीण भागात सुमारे 150 पेक्षा अधिक मित्र मंडळे असून सर्व तयारीला लागले आहेत.