भक्तिमय वातावरणात गणेश जयंती साजरी
By admin | Published: January 23, 2015 11:52 PM2015-01-23T23:52:58+5:302015-01-23T23:53:42+5:30
पंचवटी परिसर : विविध धार्मिक कार्यक्रम
पंचवटी : येथील पंचवटी परिसरातील ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. गणेश जयंतीनिमित्ताने होम, हवन, आरती, महापूजा तसेच पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
मालवीय चौकातील श्री धूम्रवर्ण गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्ताने सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धूम्रवर्ण गणेश मंदिरापासून निघालेली पालखी मिरवणूक पंचवटी कारंजा, मालवीय चौक, सरदारचौक, साईबाबा मंदिरमार्गे, कपालेश्वर पटांगण आदि भागांतून काढण्यात येऊन कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. दुपारी महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर पंचम गुरू पिठाधीश स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या हस्ते आरती व श्री गणेशाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
हिरावाडीतील शक्तीनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माघी गणेश जयंतीनिमित्ताने सप्ताहाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री गणेशाचे विधीवत पूजन करण्यात आले त्यानंतर महाआरती करण्यात येऊन गणेश जन्म साजरा करण्यात आला. गणेश जन्म होताच उपस्थित भाविकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. दुपारी भजन व कीर्तनाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती करण्यात आली. माघी गणेश जयंती उत्सवानिमित्ताने गेल्या आठवड्याभरापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचा अखंड काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला.