गणेश मंडळांना यंदा वीज दरवाढीचा झटका
By संजय पाठक | Published: September 2, 2023 10:45 AM2023-09-02T10:45:18+5:302023-09-02T10:45:40+5:30
नाशिकमधील गणेश उत्सव महामंडळाच्या बैठकीत हे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
संजय पाठक, नाशिक - राज्यातील गणेश मंडळ यंदा वीज दरवाढीचा मोठा झटका मिळणार आहे. गणेश उत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे घरगुती दराने गणेश उत्सवात वीज पुरवठा केला जातो. मात्र विजेचे घरगूती दर तीन रुपयांवरून सात रुपये असे करण्यात आल्याने गणेश मंडळांना सुद्धा यंदा सात रुपये या दराने वीज उपलब्ध होणार आहे.
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यभरात उदंड उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याचे दिसत असले तरी मंडळांच्या विविध खर्चामध्ये वाढ झाली आहे. कोरोना काळापासून बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून मिळणाऱ्या वर्गणीचा ओघ कमी झाल्याने गणेश मंडळांवर प्रायोजक शोधण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत विजेचे दर वाढल्याने मंडळांना उत्सव साजरा करताना कसरत करावी लागणार आहे.
या संदर्भात नाशिकमधील गणेश उत्सव महामंडळाच्या बैठकीत हे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली तसेच सात रुपयांच्या दरानुसार वीज जोडणीचा वापर वाढल्यास स्लॅबनुसार किमान तरी बदलू नये अशी मागणी नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी केली आहे.