निवडणूक नसल्याने गणेश मंडळांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:09 AM2018-09-11T01:09:53+5:302018-09-11T01:10:11+5:30
परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आले असून, आर्थिक तरतुदीनुसारच मंडळांना खर्चाचे नियोजन करावे लागत आहे.
इंदिरानगर : परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आले असून, आर्थिक तरतुदीनुसारच मंडळांना खर्चाचे नियोजन करावे लागत आहे. दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलीचे विघ्न आले असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी मोकळ्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावरच गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जमिनीचे सपाटीकरण व पावसामुळे चिखल होऊ नये म्हणून खडी टाकण्यात येत आहे. श्रींच्या आगमनाच्या दिवशी मिरवणुकीसाठी वाद्याचे आगाऊ पैसे देऊन नोंदणी करण्यात येत आहे. विद्युत रोषणाई आणि देखावा सजावटीवरही अंतिम हात फिरवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ परिसर, पाण्याची बचत यांसह विविध समाज प्रबोधन देखाव्यावर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे. युनिक ग्रुपच्या शहरातील सर्वांत मोठा गणेश उत्सव म्हणून बघितले जाते वतीने ८४ बाय ४०चा वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आला असून, त्यामध्ये डिजिटल देखावा आणि एलइडी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर राहणार असल्याचे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले.
द्वारकामाई मित्रमंडळ, विनयनगर मित्रमंडळ, स्वा. सावरकर मित्रमंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ आदी मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री प्रतिष्ठानच्या वतीने वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील श्री गजानन मंदिरासमोरील मैदानावर बंगाली मंदिर उभारण्याचे काम बंगाल येथून आलेले सुमारे वीस कारागीर दिवस आणि रात्र बांबू लाकूड आणि कापड याद्वारे पर्यावरणपूरक असे बंगाली टेम्पल उभारत आहेत. सदर मंदिराची उंची ६० आणि रुंदी ८० फूट आहे. - श्याम बडोदे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष