गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीला मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:12 AM2020-08-03T01:12:59+5:302020-08-03T01:14:02+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली असून, उत्सव काळात शक्यतो आॅनलाइन दर्शनाच्या सुविधा सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली असून, उत्सव काळात शक्यतो आॅनलाइन दर्शनाच्या सुविधा सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यासाठी आॅनलाइन खिडकी सुरू करण्यात आली आहे कुठल्याही परिस्थितीत ज्या गणेश मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे त्यांनाच उत्सव साजरा करता येईल, असे महापालिकेने बजावले आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने करताना सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई केली आहे.
गणेशमूर्तीच्या उंचीवरदेखील मर्यादा असून, सार्वजनिक गणेश उत्सवासाठी चार फूट, तर घरगुती गणेश उत्सव दोन फूट उंचीच्या मूर्ती असाव्यात त्याचप्रमाणे शक्यतो पारंपरिक मूर्तींऐवजी धातूच्या किंवा संगमरवरी असाव्यात. मूर्ती शाडूमातीच्या असतील तर घरगुती गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करावे. शक्य नसल्यास महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. विसर्जनासाठी येताना नागरिकांनी गर्दी करू नये, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना विसर्जनाच्या ठिकाणी नेऊ नये, असेही महापालिकेने कळविले आहे.
विसर्जन पुढच्या वर्षी करा !
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गणेशमूर्तीचे विसर्जन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी न करता पुढील वर्षीदेखील करता येणे शक्य असल्याने त्यादृष्टीने विचार करावा. त्याचप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या विसर्जन करता येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी यंदा उत्सवाच्या दहाव्या दिवशी विसर्जन टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन नियम व अटींचे पालन करीत उत्सव साजरा करावा असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीत केले. कोरोनाचा धोका कायम असल्याने काळजी घेणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.