गणरायांच्या आगमनाची तयारी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:05 PM2017-08-17T18:05:31+5:302017-08-17T18:05:42+5:30
नाशिक : गणरायाच्या आगमनाला आठवडा बाकी असताना शहरात गणशोत्सोवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरात तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीसमोरील रविवार कारंजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य मंडप उभारणीस प्रारंभ केला आहे.
शहराच्या रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, परिसरांतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे त्यांच्या आरासासाठी प्रख्यात आहेत. सुंदर नारायण मित्रमंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देण्याची आरास तयार करीत असतो, तर बी. डी. भालेकर मैदानावरील गणेशोत्सव आरासही नाशिककरांचे आकर्षण ठरत असतो. गाडगे महाराज पुतळ्याजवळील दरवर्षी आकर्षण ठरणाºया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक रंगीबेरंगी लाइट सजावटीच्या आरासास प्रारंभ झाला आहे. शहराच्या सर्वच भागांत गणरायाच्या आगमनाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने शहराच्या प्रमुख भागात जवळपास साडेपाचशेहून अधिक ठिकाणी गणेशमूर्ती विक्री केंद्रासाठी गाळे भाडे तत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या उपनगरांमध्येही गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. यंदा प्रथमच महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याचे जाहीर करून वीजचोेरीस आळा घालण्यासाठी पाऊल उचलले आहे. येत्या २५ आॅगस्टला गणरायांचे आगमन होत असून, यंदा तब्बल १२ दिवस गणरायांचा मुक्काम राहणार आहे. ५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.