गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:00 PM2019-09-02T17:00:25+5:302019-09-02T17:01:21+5:30
बाप्पांचे चाकरमान्यांबरोबर अपडाऊन
मनमाड (नाशिक) : मनमा- कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये आज नगराध्यक्ष पद्मावती धात्रक व माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या हस्ते गणेश मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. गोदावरी गणेश मंडळाचे यंदाचे २३ वे वर्ष असून दहा दिवस गणरायांचा चाकरमान्यांबरोबर मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास घडणार आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी पास बोगीमधे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेशाचे पोस्टर लावून समाजप्रबोधनाचं काम या माध्यमातून केले जाते. यंदा स्वच्छता आणि शौचालयासंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहे. ‘पोषक आहार देऊ या, सुदृढ बालक बनवू या’ अशी घोषणा अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांनी दिल्या. दररोज गाडीची वेळ होताच गाडी मार्गस्थ होते आणि गणपती बाप्पांचा मनमाड ते कुर्ला असा प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर चढणारा प्रवासी गणपती बाप्पाचे दर्शन घेतो आणि आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, अशी प्रार्थना करतो.
गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाकडून यंदा एक क्विंटल दहा किलो गव्हाचे पीठ कोल्हापूर सांगली सातारा येथे असलेल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्यात आले आहे. सर्वधर्मीय नोकरदार, प्रवासी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखं दर्शन पहावयास मिळते. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राजाभाउ भडके, उपाध्यक्ष शुभम आहिरे, प्रवीण व्यवहारे, सुरज चौधरी, विशाल आहिरे, गोरख खैरे, निलेश शिरसाठ, नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, संदिप व्यवहारे, संदिप आढाव, मंगेश जगताप, स्वप्निल म्हस्के, शेखर थोरात, स्वप्निल सरोदे, शुभम दराडे, चेतन मराठे, सुरज शुगवाणी, दुर्मिल शेलार ,धनंजय अव्हाड, भुषण पवार आदी परिश्रम घेत आहे.