सातपूर औद्योगिक वसाहतीत दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:36 AM2019-03-13T00:36:49+5:302019-03-13T00:38:17+5:30
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारा पाना, कटवणी, गुप्ती, दोरी आदी साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारा पाना, कटवणी, गुप्ती, दोरी आदी साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांचे पथक रात्र गस्तीवर होते. बंद पडलेल्या एका कारखान्याजवळ गस्ती पथकाला काही संशयित संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या दिशेने मोर्चा वळविल्याचे लक्षात येताच संशयित भत्तू दंडगव्हाळ, शरद पाटील, गोटीराम कोरडे, अशोक वायदंडे व कृष्णा वाळके (सर्व रा. सातपूर) यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर पाचही संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.