दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By admin | Published: June 17, 2017 12:38 AM2017-06-17T00:38:12+5:302017-06-17T00:38:35+5:30
पंचवटी : औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला आडगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला आडगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी संशयितांकडून दोन दुचाकी, तलवार, कोयते यांसारखे धारदार शस्त्रास्त्रे व रोख रक्कम असा जवळपास ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांपैकी तीन संशयित आरोपी हे दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी शिवारातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुरुवार (दि. १५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराला आडगाव पोलीस ठाण्याचे बिटमार्शल कर्मचारी निलगिरीबागसमोरील परिसरात गस्त घालत असताना रस्त्यालगत असलेल्या दोन दुचाकींजवळ पाच ते सहा संशयित दिसून आले त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने बीटमार्शल कर्मचाऱ्यांनी सदर माहिती तत्काळ आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांना कळविली त्यानंतर गुन्हा शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील किरण भास्कर शेळके, अविनाश मनोहर गावित, अनिकेत कैलास माळी, राहुल चिंतामण बोडके (रा. ओढा), तर आगरटाकळी येथील रोहण शिवहरी देशमुख, योगेश बाळू कडाळे आदि संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यातील काही संशयितांकडे धारदार शस्त्रास्त्रे, ब्लेडपान तसेच दुचाकींची क्रमांक (एम. एच. १५सी आर ९५९०) व (एमएच १५ सीयू ४२३०) तपासणी केली असता शिटाखाली आणखी शस्त्रास्त्रे मिळाली. पोलीसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट््स या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली त्यानुसार आडगाव पोलिसात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.