दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By admin | Published: May 12, 2017 01:40 AM2017-05-12T01:40:58+5:302017-05-12T01:41:08+5:30
नाशिक : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे. लाखलगाव जवळील पेट्रोलपंपावर पडलेल्या दरोड्यातील संशयिताचा माग काढताना पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला.
संशयितांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह एक मोटार, पाच दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, दहा मोबाइल असा एकूण सात लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी
पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोलपंपावरील दरोड्यामधील संशयिताची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवून खात्री पटल्यानंतर मखमलाबाद येथील कोळीवाडा परिसरातून नितीन निवृत्ती पारधी या संशयिताला पोलिसांनी अटक केली.
पोलीस कर्मचारी विशाल काठे, मोहन देशमुख, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले यांनी पारधीच्या मुसक्या आवळून ‘खाकी’चा हिसका दिल्यानंतर त्याने विविध गुन्ह्यांची कबुली देत त्याच्या साथीदारांसह मुद्देमालाची माहिती दिली. पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टोळीला जेरबंद करण्यात आले.