गंगा आली रे अंगणी. .
By admin | Published: August 4, 2016 12:29 AM2016-08-04T00:29:59+5:302016-08-04T00:30:35+5:30
त्र्यंबकेश्वर जलमय : पाणीच पाणी चहुकडे
त्र्यंबकेश्वर : येथे पुराचे पाणी गावात कायम असून, ब्रह्मगिरीतील धबधबे वेगात वाहत होते. आज कुशावर्त तीर्थ संपूर्णपणे वरपर्यंत भरले होते. अनेकांनी ते उपसण्याचा प्रयत्न केला. विधीसाठी आलेल्या एका भाविकाला दारातूनच पिंडदान दारासमोरील नदीत वाहण्यास सांगितल्याने त्या भाविकाने पिंडदान करण्याठी गंगा आली रे अंगणी..! केवढे त्याचे भाग्य ! गावात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने पाहणी करण्याकरिता दीपक लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, यशवंत भोये, अभिजित काण्णव आदि फिरत होते. त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला.
परिणामी गावातील विद्युतपुरवठा रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. तेली गल्लीत भूमिगत विद्युतवाहिन्या असल्याने खोलपर्यंत पाणी गेलेले असल्याने संपूर्ण गावाचा विद्युतपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले. त्र्यंबकला गेल्या तीन दिवसांपासून संततधार असून, आज दिवसभर मुसळधारेने शहराला झोडपून काढले. ‘गावात पाणीच पाणी चहुकडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या रविवारपासून येथे पावसांची संततधार सुरू आहे. अवघ्या तीन दिवसात ४२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैअखेर केवळ ३२ दिवसांत ११२५ मिमीपावेतो पावसाची नोंद झाली आहे. रविवारी ६३ मिमी, सोमवारी १२८ मिमी, तर मंगळवारी २३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अधून मधून प्रचंड वेगाने सरी बरसत होत्या.
नदीपात्रात काही ठिकाणी कचरा अडकल्याने गावात पाणी पातळीत वाढ होऊन मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पाणी कमी होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने गावात पाणी साचलेलेच आहे. कुशावर्त चौक, तेली गल्ली, भगवती चौक, लहान बजारपट्टी, मेनरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न. पा. कार्यालयासमोरील संपूर्ण रस्ता, गोदावरी पुलावरील रस्ता, कदम पेट्रोलपंपासमोरील रस्ता आदि ठिकाणे जवळपास २ ते ३ फूट पाण्याखाली गेली होती. या ठिकाणी बस व मोटारसायकल पाण्यात अडकून तेथेच बंद पडल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. (वार्ताहर)