ओडिसातील गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:03 AM2018-06-17T01:03:34+5:302018-06-17T01:03:34+5:30
महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या संशयितास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ओडिसातून ताब्यात घेतले आहे. नाशिकसह, सिन्नर, धुळे, नागपूर येथील अवैध व्यावसायिकांना हा संशयित गांजा पुरवत असल्याचे वृत्त आहे.
नाशिक : महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या संशयितास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ओडिसातून ताब्यात घेतले आहे. नाशिकसह, सिन्नर, धुळे, नागपूर येथील अवैध व्यावसायिकांना हा संशयित गांजा पुरवत असल्याचे वृत्त आहे. ओडिसातून नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, ओडिसातून ताब्यात घेतलेल्या आरोपीला रविवारी (दि.१७) सायंकाळपर्यंत नाशिकला आणण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी एका ट्रकमधून ६८० किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून, त्यानंतरच्या तपासात सिन्नर तालुक्यात विकलेला सुमारे ३९० किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते. तसेच एका संशयितालाही अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा गांजा ओडिसातून आणल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांचे एक पथक ओडिसाला अधिक तपासासाठी गेले होते. ओडिसातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गांजा तस्करांची चौकशी करून अकबर नामक संशयितास ताब्यात घेतले आहे.
अकबर हा महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजा पुरवत असल्याचे तपासातून समोर आले असून, त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यातील गांजा तस्करांची पाळेमुळे शोधून काढण्यास पोलिसांना मदत होणार आहे. दरम्यान, गांजा तस्करीमध्ये नाशिक जिल्ह्णातील काही सराईत गुन्हेगारांचा सुगावा पोलिसांना लागला असून, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.