समर्थ सेवामार्गाच्या वतीने गंगापूजन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:46 PM2021-06-16T23:46:50+5:302021-06-17T00:54:20+5:30
नाशिक : यंदा वरुणराजाने कृपा करावी, तसेच पर्जन्याबरोबरच समृद्धीदेखील यावी यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, श्री ...
नाशिक : यंदा वरुणराजाने कृपा करावी, तसेच पर्जन्याबरोबरच समृद्धीदेखील यावी यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१५) गंगापूजन करण्यात आले.
यावेळी गुरुमाउली प.पू. अण्णासाहेब मोरे यांनी मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत सपत्नीक गंगापूजन करीत प्रामुख्याने भारत कोरोनामुक्त व्हावा यासाठी लाखो सेवेकऱ्यांच्या वतीने गंगा गोदावरीमातेस साकडे घातले.
ज्येष्ठ शुद्ध १ ते १० या दहा दिवसांत गंगा गोदावरीमाता उत्सव व गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. गंगामाई सर्वांचा उद्धार करणारी, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी, जीवसृष्टी, प्राणिमात्रांना संजीवनी देणारी
आहे. त्यामुळे गोदामातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्थ
सेवामार्गाच्या वतीने दरवर्षी गंगापूजन सोहळा संपन्न होतो. हजारो सेवेकरी रामकुंडावर एकत्रितपणे या सोहळ्याच्या निमित्ताने पर्जन्यराजास विनंती करतात, तसेच रामकुंड व आपापल्या गावातील नदीवर लाखो सेवेकरी पूजन करतात.
त्यानुसार मंगळवारी गुरुमाउलींनी गोदामातेचे पूजन करून विनंती केलीच; परंतु सध्या जगासमोर जे भयानक संकट कोरोनाच्या रूपाने उभे आहे, त्यातून सर्वांना दिलासा मिळावा यासाठीसुद्धा साकडे गंगामाईस घालण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महेश हिरे हे उपस्थित होते.
दरम्यान, रामकुंडावर झालेल्या कार्यक्रमात मोजक्याच लोकांनी हजेरी लावली; पण देशभरातील लाखो आबालवृद्ध सेवेकऱ्यांनी ऑनलाइन हजेरी लावली.
दरवर्षी गंगापूर रोडवरील उदयनगर केंद्रातून गंगाजल कलशाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते; परंतु यावर्षी हा कलश चारचाकी वाहनातून रामकुंड येथे आणण्यात आला. याप्रसंगी मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टींचे कडक पालन करण्यात
आले.