गंगापूर धरणातून पावणेतीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:09 PM2017-07-30T15:09:19+5:302017-07-30T15:12:30+5:30
नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दोन हजाराने कमी करण्यात येऊन सध्या धरणातून नदीपात्रात २९६२ क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे.
शनिवारी सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत गंगापूर धरणातून ५ हजार १०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत कायम राहिला. त्यानंतर जलसंपदा विभागाने विसर्ग कमी करत धरणाचे दरवाजे काही फूटापर्यंत खाली केले. सध्या धरणातून दोन हजार ९६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी दुपारपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. आजदेखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात प्रवाहित पाण्याच्या पातळीतही तीन हजार क्युसेकने घट झाली आहे. होळकर पूलावरून सध्या ४ हजार ८८८ क्युसेक पाणी प्रवाहित आहे. गंगापूर धरण ८१टक्के भरले आहे.