गंगापूर धरण @ 38 टक्के
By admin | Published: July 11, 2016 12:06 AM2016-07-11T00:06:42+5:302016-07-11T00:52:43+5:30
धरण क्षेत्रात २५२ मिमी पाऊस : बारा तासांत १४ टक्क्यांनी वाढ; संततधार सुरूच असल्याने पातळीत वाढ शक्य
नाशिक : गेल्या २४ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा अठरा टक्क्यांनी वाढला आहे. १९ टक्क्यांवर असलेल्या धरणाची पातळी थेट ३७.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. रविवारी (दि.१०) धरण क्षेत्रात बारा तासांत २५२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूणच धरणाचा वाढलेला जलसाठा ही बातमी नाशिककरांना दिलासा देणारी आहे.
रविवारी पावसाने सायंकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३३ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. दिवसभरात विक्रमी पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. धरण क्षेत्रात रविवारी बारा तासांमध्ये सुमारे २५२ मिलिमीटर पाऊस झाला असून, गंगापूर धरणाचा जलसाठा दोन हजार १२५ दशलक्ष घनफूट इतका वाढला आहे. मागील आठवड्यात गंगापूर धरणात १९ टक्के जलसाठा होता. रविवारच्या पावसाने धरणाच्या पाण्याच्या पातळीत अठरा टक्के वाढ होऊन ३७ टक्के धरण भरले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेपासून तर रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरणात २३ टक्के जलसाठा होता; मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे बारा तासांत १४ टक्क्यांनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दारणा धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली असून, चार हजार ११९ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा असून ५२.६२ टक्के दारणा धरण भरले आहे.