गंगापूर धरण @ ९० टक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:40 AM2018-08-18T00:40:19+5:302018-08-18T00:40:39+5:30
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे.
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. गुरुवारपासून जिल्ह्यात जोरदार सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरीत पहाटेपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची कार्यवाही केली, परिणामी गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. असाच प्रकार दारणा धरणाच्याबाबत घडल्यामुळे तेथूनही विसर्ग करण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ११ टीएमसी पाणी पोहोचले होते. परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही जेमतेम साठा असल्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गुरूवारी दिवसभर हजेरी कायम ठेवली व विशेष करून विशेष करून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातील गंगापूर येथे ८६, कश्यपि ४५, गौतमी ४५, त्र्यंबकेश्वर ४६ व आंबोली येथे ९३ मिली मीटर पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालिची वाढ झाली. शुक्रवारी सकाळपासूनही पावसाने सातत्य राखल्यामुळे सकाळी दहा वाजता गंगापूर धरणातून १०१२ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. गंगापूर धरण समुहातील गंगापूर, कश्यपि, गौतमी गोदावरी व आळंदी या चार धरणाची साठवण क्षमता १०३२० दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी १७ आॅगष्ट रोजी ९४४४ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले होते. यंदामात्र त्यात वाढ होवून ९५२५ दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे. त्याची टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे.
पावसाचे पुनरागमन, जनजीवन विस्कळीत गेल्या काही आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने नाशिकमध्ये पुन्हा हजेरी लावली असून, शहरात तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संतत आधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास महिनाभरानंतर पुनरागमन झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून, तपमानातही लक्षणीय घट झाली आहे. नाशिक शहरात गेल्या २४ तासांत ३५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सकाळी साडेआठ वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.६ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या २४ तासांत गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध नाल्यांसह नासार्डी व गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरातील सखल भागात विविध ठिकाणी पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्यानंतर रस्त्यावरील वाहतूकही विरळ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पावसासह अधून-मधून जोरदार सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा पसरला असून, तपमानाचा कमाल पारा २४ अंशांपर्यंत घसरला आहे.
सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
गेल्या महिनाभरापासून विश्रांती घेतेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने गोदावरीची पाणी पातळी वाढली असून, गंगापूर धरणही ९० टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सोमेश्वर धबधबा पुन्हा खळाळून वाहू लागल्याने नाशिककरांसह बाहेरून येणाºया पर्यटकांनी सोमेश्वर धबधब्यावर पावसाची मौज घेण्यासाठी गर्दी केली होती.