गंगापूर धरणातून विसर्गामध्ये वाढ ; गोदावरीला पूरसदृश स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:18 AM2018-08-22T01:18:29+5:302018-08-22T01:18:43+5:30
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ
नाशिक : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ करण्यास प्रारंभ झाला. यामुळे संध्याकाळी ७ वाजता गोदावरीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. दुतोंड्या मारुतीच्या मूर्ती पुराच्या पाण्यात निम्मी बुडाली होती. संध्याकाळी होळकर पुलाखालून पाच हजार क्यूसेक पाणी पुढे प्रवाहित झाले होते. दिवसभरात १५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि शहरात सुरू असलेली संततधारेने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली होती. गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने आवक सुरू राहिल्याने दुपारी ४ वाजता ३ हजार १२० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. संध्याकाळी ६ वाजता विसर्ग अधिक वाढविण्यात आल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रामसेतू पुलाला पुराचे पाणी लागले होते.