गंगापूर धरण भरले ९३ टक्के, ४२ हजार क्युसेक विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:14 PM2019-08-04T13:14:52+5:302019-08-04T13:17:09+5:30
नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.
नाशिक-नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.
गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर कायम असून दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला जात असून सकाळी प्रारंभी २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो वाढवून ४२ हजार क्युसेक पाण्यात वाढवण्यात आला आहे. २००८ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले होते. त्यानंतर प्रथमच इतके पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने आनंदवल्लीचा जुना पुल, आसाराम बापु पुल, फॉरेस्ट्र नर्सरी, रामवाडी गाडगे महाराज पुल यासाह अन्य अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. कपालेश्वराच्या आठ पायऱ्या तर सरकारवाड्याच्या तीन पायºया पाण्याखाली गेल्या आहेत. फॉरेस्ट नर्सरी पुलाच्या परीसरत सुयोजित गार्डन, सामाजिक वनीकरणाची रोपवाटीका यात पाणी शिरले आहे. याशिवाय रामवाडी, गंगावाडी, सराफ बाजार येथे देखील पाणी शिरले आहे.
उपनगरातही समस्या
नासर्डी नदीला पुर आल्याने नाशिक शहरानजीकच्या तिरडशेत, पिंपळगाव बहुला परीसरात पाणी शिरले आहे. नासडी नदीला पाणी वाढल्याने उंटवाडी तसेच तिडके कॉलनीतील मिलींद नगर पुल पाण्याखाली गेला असल्याने संपर्क खंडीत झाला आहे. सीटी सेंटर मॉल चौकात पाणी साचल्याने देखील वाहतुक ठप्प झाली आहे.
नाशिकरोडला रहीवाशांचे स्थलांतर
नाशिकरोड देवळाली गाव परीसरात वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे रोकडोबावाडी येथील नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. देवळाली गाव तसेच विहीत गाव येथील दशक्रिया विधी शेड पाण्याखाली गेले आहे.
भगुर शहरात नुकसान
रात्रभरच्या पावसामुळे भगूर येथील क्रांती चौकातील रामदास कासारयांचे दोन रूमचे घर सकाळी पडले. यात जीवीत हानी झाली नसली तरी ६० ते ६५ हजाराचे नुकसान झाले आहे. या भागातील स्मशान भूमीत देखील पाणी शिरले आहे.
वडाळा गाव पसिरात परिसरात पाणी
वडाळागाव, साईनगर, विनय नगर, शिवाजीवाडी, भारत नगर या भागात पाणीच पाणी झाले आहे. नासर्डी नदीवरील शिवाजी वाडी तसेच पखाल रोडवरील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील संपर्क खंडीत झाला आहे.