नाशिकचे गंगापूर धरण 74 तर भावली 100 टक्के भरले; दरणामधूनही विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:04 PM2019-07-28T13:04:03+5:302019-07-28T13:11:12+5:30
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत आज पहाटेपर्यंत एकूण 441मिमी इतका पाऊस झाला.
नाशिक : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण समूहासह भावली, दारणा धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. भावली 100 तर दारणा 87 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाचाही जलसाठा वाढला असून धरण 74 टक्के भरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही नाही. आज सकाळी इगतपुरीत मागील 24 तासांत 126 तर त्रंबकेश्वर मध्ये 172 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचा जलसाठा वाढत असून शहरी भागासह मराठवाड्यासाठी ही बाब दिलासा देणारी आहे. दरणामधून आज सकाळी सहा वाजता 16 हजार 598 तर भावलीमधून 1 हजार 218 क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत आज पहाटेपर्यंत एकूण 441मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक त्रंबकेश्वर मध्ये 172 तर आंबोलीत 92 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे 477 दलगफू पर्यंत नव्याने पाण्याची आवक गंगापूर धरणात होऊन धरण 74.35 टक्के भरले. या समूहातील कश्यपी 48 तर गौतमी 58 टक्के भरले आहेत. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाकडून गंगापूर मधून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शुक्रवारपासून नाशिक शहारतदेखील मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे.पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात संततधार सुरू होती. मागील 24 तासांत 17 मिमी पर्यंत पाऊस शहरात नोंदविला गेला.