गंगापूर धरणसाठा ९० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:13+5:302021-08-25T04:20:13+5:30

नाशिक : कधी जोरदार पाऊस तर कधी रिमझिम धारा. मुसळधार पावसाचा अंदाजही फोल असताना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा ...

Gangapur dam stock at 90 percent | गंगापूर धरणसाठा ९० टक्क्यांवर

गंगापूर धरणसाठा ९० टक्क्यांवर

Next

नाशिक : कधी जोरदार पाऊस तर कधी रिमझिम धारा. मुसळधार पावसाचा अंदाजही फोल असताना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा साठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणातील समाधानकारक साठ्यावरून नाशिक शहरावरील पाणी संकटही टळले आहे. असे असले तरी गतवर्षी या कालावधीत धरणाचा साठा हा ९४ टक्के इतका होता. यंदा जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे नाशिककरांना संमिश्र पावसाचा अनुभव आला आहे. जूनमध्ये पाऊस न झाल्याने पावसाने चिंता वाढविली असताना जुलैच्या मध्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानही झाले. त्यानंतर पुन्हा पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यात पाऊस स्थिरावत असल्याचे वाटत असतानाच पुन्हा पावसाने ओढ दिली.

ऑगस्टमध्येही ऊन-सावलीचा खेळ कायमच बघायला मिळाला. मागील आठवड्यात संततधार सुरू झाली असतानाच कालपासून प्रखर ऊन पडू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

यातही गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात झालेली वाढ समाधानकारक मानली जात आहे. सोमवारी (दि. २३) धरणाचा साठा ९० टक्के इतका होता तर समूहातील पाण्याची पातळी ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. आळंदी धरण शंभर टक्के भरल्याने तेथून ३० क्युसेकचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत गंगापूर धरणात ९० टक्के, काश्यपी ६३, गौतमी गोदावरी ७२ तर आळंदी धरणात १०० टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा समूहातील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. समूहातील साठा ८३ टक्के इतका असून, मागील वर्षी हाच साठा ७८ टक्के इतका होता.

गंगापूर धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यातील सात धरणांमध्ये अजूनही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सद्य:परिस्थितीत ६४ टक्के पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच दिवशी ७३ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत ९ टक्यांनी साठा कमी आहे.

--इन्फो--

विसर्गही सुरू

जिल्ह्यातील धरण समूहांमध्ये अद्यापही अपेक्षित पाणीसाठा नसला तरी पाच धरण प्रकल्पांमधून किरकोळ स्वरूपाचा विसर्गही केला जात आहे. दारणातून १५०, भावली ७३, वालदेनी १८३, नांदुरमध्यमेश्वर ८०७, हरणबारीमधून ५२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Web Title: Gangapur dam stock at 90 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.