गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:19 AM2021-09-12T04:19:05+5:302021-09-12T04:19:05+5:30
राज्याच्या काही भागात जाेरदार पाऊस होत असताना नाशिकमध्ये मालेगावातील साकोरा तसेच नांदगाव आणि मनमाडमध्ये अतिवृष्टी झाली. नाशिक शहरात मात्र ...
राज्याच्या काही भागात जाेरदार पाऊस होत असताना नाशिकमध्ये मालेगावातील साकोरा तसेच नांदगाव आणि मनमाडमध्ये अतिवृष्टी झाली. नाशिक शहरात मात्र त्या तुलनेत कमी पाऊस असून रात्री किंवा सकाळी पावसाची रिपरिप सुरू असते आणि सायंकाळी पुन्हा पाऊस हाेतो. मात्र हे प्रमाण फार नाही. मात्र, गणेशाेत्सव सुरू होऊन दुसरा दिवस सुरू होताच, पावसानेही आपली हजेरी कायम ठेवली. शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी काही वेळ कोसळलेल्या पावसाने रात्रीतून अधून मधून हजेरी लावली. मात्र, शनिवारी पहाटेपासूनच शहर व परिसराला झोडपून काढले. सकाळी दोन तास विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. सध्या गणेशोत्सव सुरू झाल्याने पावसाच्या संततधारेमुळे गणेश मंडळांची धावपळ उडाली. अनेकांनी मंडपाला प्लास्टिकची आच्छादने टाकली तर काही मंडळांच्या आरासवर ही त्याचा परिणाम झाला. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिक भ्रमंती करतात. शनिवार हा शासकीय सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी सायंकाळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळनंतर पावसाने जाेरदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठा ही लवकरच बंद झाल्या. पावसामुळे शहरातील मार्गावर पाणीच पाणी झाले आणि अनेक भागात नाले ही वाहू लागले आहेत.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा वाढला असून तो आता ९४ टक्के इतका झाला आहे. नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
इन्फो....
धरणातून विसर्ग हेाण्याची शक्यता...
गंगापूर धरणातील साठा ९४ टक्के इतका असून रात्रीतून पाऊस झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री पाणलाेट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून गाेदापात्रात विसर्ग होण्याची शक्यता आहे.