नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज होणार विसर्ग
By संजय पाठक | Published: July 28, 2023 11:59 AM2023-07-28T11:59:18+5:302023-07-28T12:00:22+5:30
यंदा नाशिकला उशिराने पाऊस सुरू झाला असून अद्याप गोदावरी नदीला पुरही आलेला नाही तर गंगापूर धरणातून आज पहिला विसर्ग सुरू होत आहे.
संजय पाठक
नाशिक- शहर परिसरात यंदा पावसाचा जोर कमी असला तरी काही दिवसांपासून इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुक्यात चांगला पाऊस होत आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने हे धरण 70 टक्के भरले आहे त्यामुळे आज दुपारी बारा वाजता 539 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा नाशिकला उशिराने पाऊस सुरू झाला असून अद्याप गोदावरी नदीला पुरही आलेला नाही तर गंगापूर धरणातून आज पहिला विसर्ग सुरू होत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे आणखी एक मुकणे धरण 62 टक्के भरले आहे. इगतपुरीतील दारणा धरणातून सध्या 10 हजार 514 क्यूसेक तर निफाड मधील नांदूरमाध्यमेश्वर मधून 5 हजार 576 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.