गंगापूर, दारणामधून विसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:14 AM2017-07-22T01:14:13+5:302017-07-22T01:14:26+5:30
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला. गंगापूर धरण ७५ टक्के भरल्याने धरणातून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला. सध्या १ हजार ६६४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे, तर दारणातून १३ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नांदूरमधमेश्वर धरणातून २४ हजार ७४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचा जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून अडीच हजार क्यूसेक, तर दारणातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना दोन दिवसांपूर्वी पाण्याचा जोर ओसरल्याने विसर्गातही कपात करण्यात आली होती. परंतु, गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे पुन्हा एकदा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून एक हजार ६६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, दारणा धरणातून १३ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नांदूरमधमेश्वर धरणातून १४ हजार ७४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्णातील पश्चिम पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांची पातळी चांगलीच वाढली आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, निफाड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणातून गेल्या दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाची पातळीही ७५ टक्के झाली असून, दारणा धरण ८३ टक्के भरले आहे.