आधारकार्ड केंद्र नसल्याने गंगापूरवासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:37+5:302021-04-04T04:14:37+5:30
नाशिक : गंगापूर परिसरात एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, नवीन आधारकार्ड, नोंदणी, नावातील, ...
नाशिक : गंगापूर परिसरात एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, नवीन आधारकार्ड, नोंदणी, नावातील, फोटो, पत्ता बदल आदी विविध कामांसाठी नागरिकांना शहरात यावे लागत असून, तासंतास प्रतीक्षा करूनही काम होत नसल्याने नागरिकांच्या वेळेचे व पैशाचे नुकसान होत आहे. गंगापूर परिसरात जवळपास १० किलोमीटरच्या परिघात एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिक संतप्त असून, या भागात लवकरात लवकर आधारकेंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शासकीय योजनेला अथवा निमशासकीय योजनेला आधारकार्ड प्रत्येक ठिकाणी मागितले जात असल्याने नागरिकांना ते अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीला नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाचे याकडे लक्षच नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही लोकप्रतिनिधीनेही शासनाचे याकडे लक्षही वेधले नाही. त्यामुळे गंगापूर, ध्रुवनगर, गोवर्धन, सोमेश्वर, जलालपूर, आंबेडकरनगर, महादेवपूर, सावरगाव, गंगव्हरे, रानमळा, शिवाजीनगर, धारणा परिसर आदी भागातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लहान मुलांना, शेतावर जाणाऱ्या शेतमजुरांना आपले काम बंद करून १०-१० किलोमीटर लांब नाशिक शहराच्या ठिकाणी आधारकेंद्रावर आपल्या आधाराची दुरुस्ती असो अथवा नवीन आधार काढण्यासाठी जावे लागते. दरम्यान, नागरिकांची ही गरज बघता गंगापूर गावात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इन्फो-
वेळेसोबतच पैसा खर्च
गंगापूर गावातील आजूबाजूच्या पाच ते सात किलोमीटरपर्यंत एकही आधार केंद्र नसल्याने ज्येष्ठ नागरिक, मजूर, शेतकरी यांना शहराच्या ठिकाणी आधार केंद्रावर नवीन आधारकार्ड अथवा दुरुस्तीसाठी जावे लागते, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो. प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयासह बँक, पोस्ट या ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून गंगापूर गाव व परिसरात कुठेही आधार केंद्र सुरू झालेले नाही.