बिबट्याच्या डरकाळीने गंगापूररोडवासीयांचा उडाला थरकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:11+5:302021-04-19T04:13:11+5:30

गंगापूररोडवरील नरसिंहनगरचा परिसरात मोठ्या इमारती, बंगले, रो-हाऊस आहेत. या भागात काही मोकळ्या भूखंडांवर झाडीझुडपांचे साम्राज्यही आहे. या झाडीझुडपांमध्ये सकाळी ...

Gangapur Road residents tremble due to fear of leopard | बिबट्याच्या डरकाळीने गंगापूररोडवासीयांचा उडाला थरकाप

बिबट्याच्या डरकाळीने गंगापूररोडवासीयांचा उडाला थरकाप

Next

गंगापूररोडवरील नरसिंहनगरचा परिसरात मोठ्या इमारती, बंगले, रो-हाऊस आहेत. या भागात काही मोकळ्या भूखंडांवर झाडीझुडपांचे साम्राज्यही आहे. या झाडीझुडपांमध्ये सकाळी बिबट्याने दोन ठिकाणी आश्रय घेतला. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच नाशिक पश्चिम वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही बिबट्या धावताना कैद झाल्याचा भक्कम पुरावा वनखात्याच्या हाती लागला. यामुळे पथकाने याच भागात तळ ठोकून शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, खासदार भारती पवार यांच्या बंगल्यापासून पुढे काही अंतरावर एका भूखंडावर बंदिस्त पत्र्याच्या कुंपनाच्या आत गाजरगवताच्या आडोशाला बिबट्याने दर्शन दिले. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी या बचाव मोहिमेचा मोर्चा सांभाळला. पत्र्याच्या शेडमध्ये झाडीत बिबट्या दडून बसल्याची खात्री पटली; मात्र काही वेळेत बिबट्याने ही जागा सोडून शेजारच्या इमारतीच्या वाहनतळात झेप घेतली. तेथून तो पुढे ‘फुलोरिन’ रो-हाऊसच्या पार्किंगमध्ये कारखाली येऊन लपला. रहिवाशांचा कल्लोळ सुरू होताच बिबट्याने येथून धूम ठोकली. बिबट्याने कुंपनावरून थेट अक्षरधाम सोसायटीच्या पार्किंगमध्ये उडी घेतली. या सोसायटीच्या ‘सी’ विंगच्या पहिल्या मजल्यावर जिन्यात बिबट्या जाऊन बसला. बिबट्या एका जागी स्थिर राहत नसल्याने त्यास बेशुध्द करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याला बेशुध्द करण्यास वनकर्मचाऱ्यांना यश आले.

---इन्फो---

दारे-खिडक्या झटपट झाल्या बंद

बिबट्याच्या भीतीने नरसिंहनगर, सिंहस्थनगर या भागातील रहिवाशांनी आपापल्या घरांची दारे, सेफ्टी दरवाजे, खिडक्या, बाल्कनींचे दरवाजे सुरक्षिततेसाठी झटपट बंद करून घेतले होते. काहींनी इमारतींच्या गच्चींवर थाव घेत उंचीवरून बिबट्यावर लक्ष ठेवले होते. यावेळी बहुतांश लोक बिबट्या दिसल्यास गच्चवरून आरडाओरड करत असल्याने बिबट्या बिथरून या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या घेत स्वत:चा जीव वाचविण्याकरिता सुरक्षित जागेचा शोध घेत होता.

---इन्फो---

विवेक भदाणे यांच्यावर बिबट्याची चाल

बिबट्याला रेस्क्यू करत असताना ट्रॅन्क्युलाइज गनद्वारे त्यास डार्ट मारण्याच्या तयारीत असलेल्या वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यावर अक्षरधाम इमारतीच्या पार्किंगमध्ये बिबट्याने चाल केली. या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले. बिबट्याने त्यांच्या पायाच्या पोटरीला पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले.

---इन्फो--

‘चाणक्य’मध्ये अचूक ‘निशाणा’

अक्षरधाम सोसायटीतून बिबट्या जिन्याने खाली उतरला आणि शेजारच्या चाणक्य इमारतीत उडी घेत जिन्याखालील मोकळ्या जागेत जाऊन दडून बसला. पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भुलीचे औषध असलेले इंजेक्शन घेत वनरक्षक दीपक जगताप यांनी निशाणा साधत ‘ब्लो पाइप’द्वारे अचूकरीत्या ‘डार्ट’ मारला. काही मिनिटांतच बिबट्या बेशुध्द पडला आणि मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले, वनरक्षक उत्तम पाटील, सचिन आहेर, गोविंद पंढरे, सोमनाथ निंबेकर आदींनी बिबट्याला स्ट्रेचरवरून बाहेर आणले.

रेस्क्यू वाहनातील पिंजऱ्यात सुरक्षितरीत्या बिबट्याला बंदिस्त करून वाहनातून थेट गोवर्धन येथील वनखात्याच्या नर्सरीत हलविले.

--इन्फो--

दोन वर्षांची बिबट्याची मादी

सुरक्षितरीत्या रेस्क्यू केलेला बिबट्या (मादी) हा दोन वर्षांचा आहे. रोपवाटिकेत या बिबट्याला तत्काळ भुलीचे ॲन्टिडॉट औषध पशुवैद्यक वैशाली थोरात यांनी दिले. यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटांतच बिबट्या पुन्हा शुध्दीत आला अन‌् डरकाळी फोडली. तत्काळ त्यास पाणी पाजण्यात आले. बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांनी सांगितले. पुशवैद्यकांच्या पडताळणीनंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Gangapur Road residents tremble due to fear of leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.