गंगापूरगाव परिसरात मूर्ती विसर्जनास मनाई
By admin | Published: September 9, 2016 01:20 AM2016-09-09T01:20:00+5:302016-09-09T01:20:12+5:30
मागील वर्षाची पुनरावृत्ती टाळणार : मूर्तिदानावर विशेष भर
नाशिक : गतवर्षी गोदाकाठच्या गंगापूर, गोवर्धन शिवारात करण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे निर्माण झालेला धार्मिक व भावनिक तणाव दूर करण्यासाठी यंदा या भागात एकाही व्यक्तीला गणेशमूर्ती विसर्जित न करू देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, सोमेश्वर धबधब्यापासून पुढे रामकुंडापर्यंत भाविक कोठेही विसर्जन करू शकतील, अशी व्यवस्था करण्याबरोबरच मूर्तिदानावर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले आहे.
यासंदर्भात शनिवारी सकाळी तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. गेल्यावर्षी मुळातच गंगापूर धरणात पाणी कमी असल्यामुळे गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले नव्हते, मात्र तरीही गंगापूर, गोवर्धन शिवारातून जाणाऱ्या गोदावरीत मूर्ती विसर्जनासाठी भाविकांचा अट्टहास पाहता, जवळपास सात ते साडेसात हजार मूर्ती या पात्रातच टाकून देण्यात आल्या, परिणामी दुसऱ्या दिवशी ही बाब उघडकीस येताच गजहब माजला होता. यासाठी सोमेश्वर धबधब्यापासूनच बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, शहरातील एकही मूर्ती गोवर्धनच्या पुढे न जाऊ देण्याचे ठरविण्यात आले. गंगापूर, गोवर्धनवासीय तसेच धरणाच्या पुढील गावांनीदेखील याच ठिकाणी विसर्जन करावे, यासाठी आग्रह धरला जाणार आहे.
या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ सोमेश्वर, आनंदवल्ली, आसारामबापू पूल, घारपुरे घाट, रामवाडी, रामकुंड या गोदावरीच्या दुतर्फा स्थळांची पाहणी करण्यात आली. भाविकांनी मूर्ती विसर्जन करण्याऐवजी शक्यतो त्या दान कराव्यात यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी काही खासगी संस्था, संघटनांना प्रवृत्त केले जाणार आहे. तसे झाल्यास गोदावरीचे प्रदूषण टळण्यास मदत होणार आहे. या बैठकीस पोलीस अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)