गंगापूरमधून अडीच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
By admin | Published: August 1, 2016 12:36 AM2016-08-01T00:36:02+5:302016-08-01T00:37:02+5:30
गोदावरीला पुन्हा पूर : विक्रेत्यांची तारांबळ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा,दिवसभरात २३ मि.मी. पावसाची नोंद
नाशिक : गंगापूर धरणाचा जलसाठा रविवारी (दि.३१) सकाळी ६ वाजता ८०.७१ इतका होता. पावसाची संततधार पहाटेपासून दिवसभर कायम राहिली. पावसाचा अंदाज घेत जलसंपदा विभागाने सकाळी १० वाजता पहिल्या टप्प्यात एक हजार ८०, तर दुपारी दोन वाजता एक हजार ६६० क्यूसेक असे एकूण दोन हजार ७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला होता.
पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सकाळी ११ वाजेपर्यंत दमदार होता; मात्र दुपारी ११ वाजेनंतर पावसाचा जोर ओसरला; मात्र संततधार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. वीस दिवसांपूर्वी गोदामाईला नाशिककरांनी दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच खळाळून वाहताना बघितले होते. धरणामधून त्यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नसतानाही वरुणराजाच्या जोरदार हजेरीने गोदामाई दुथडी भरून वाहत होती.
सोळा तासांमध्ये शहरात जवळपास पावणे दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद त्यावेळी करण्यात आली होती. पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नाशिककरांसाठी तो दिवस ‘सुपर सण्डे’ ठरला होता. त्यानंतर
पुन्हा या रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककरांना पुन्हा ‘सुपर सण्डे’ची आठवण झाली खरी; मात्र पावसाचा जोर दुपारनंतर कमी होत गेल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील हवामान खात्याला २२.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करता आली. धरण
क्षेत्रात बारा तासांमध्ये ४५ ते ५० मिलिमीटर पाऊस पडला, तर धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात ३६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
दिवसभर गंगापूर धरण समूहाच्या परिसरात पावसाची संततधार कायम होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणामधून एक हजार ८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला व त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एक हजार ६६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात
आला.
एकूण दोन हजार ७४० क्यूसेक इतके पाणी नदीपात्रातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रवाहित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व जलसंपदा विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी)