नाशिकमध्ये कुरापत काढून कार लुटणारे टोळके जेरबंद
By नामदेव भोर | Published: May 7, 2023 05:17 PM2023-05-07T17:17:17+5:302023-05-07T17:18:01+5:30
कार लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी संशितांपैकी तिघांना वडाळा गावातून अटक केली आहे.
नाशिक : इंदिरानगर भागात रीक्षाला कट मारल्याच्या कारणावरून कुरापत काढून अनोळखी चौघांच्या टोळक्याने शनिवारी (दि.६) मध्यरात्री २ वाजेच्या सुभाष पाळेकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांची चारचाकी (एमएमच १५ एफटी ७१७६) लुटल्याची घटना घडली होती. ही कार लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी संशितांपैकी तिघांना वडाळा गावातून अटक केली आहे.
पोलिसांनी कार लुटणाऱ्या संशयित युनिस उर्फ अण्णा आयुब शहा (२४, म्हाडा कॉलनी, वडाळा),वशीम बसीर सैयद ( ४१, रा. संजेरीमार्ग वडाळा) , गुलाम सादीक मोंढे(२७, रा. वज्रेश्वरी मंदिराजवळ वडाळा) यांना नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बागूल पोलिस हवालदार प्रविण वाघमारे, विशाल देवरे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ यांनी गुन्हा दाखल होताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे शोध घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाळेकर यांचे लुटलेले घड्याळ, मोबाईल, पांढरी अंगठी व साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली रीक्षा ( एमएच१५, झेड ९८४७ एसा एकूण ९६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.