गँगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:10 AM2021-04-24T01:10:51+5:302021-04-24T01:11:51+5:30
दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आला.
नाशिक : दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आला. बिल्डरकडे सुमारे दहा कोटीची खंडणी मागण्याची धमकी पुजारी याने दिल्याने त्याच्या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी न्यायालयाने पुजारी यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रवी पुजारी याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी असलेले संबंध व टोळ्यांशी असलेले वैमनस्य पाहता त्याच्या दौऱ्याबाबत पुरेपूर गोपनीयता मुंबई व नाशिक पोलिसांनी पाळत, न्यायालयात हजर केले.
वडाळा-पाथर्डी रोडवर एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू असताना गँगस्टर रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास गेम करू, अशी धमकी दिली होती. त्याचाच भाग म्हणून २५ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात बांधकाम व्यावसायिकांचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे याचा तपास देण्यात येऊन पोलिसांनी चौघा जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी, योगेश कल्ली ऊर्फ सुरेश बंगेरी व भुपेंद्र राजपत सिंह हे तिघे फरार होेते. मात्र, ज्या चार आरोपींना अटक करण्यात आली. त्या चौघांपैकी तिघांना २०१९ मध्ये जन्मठेप तर एकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. गँगस्टर रवी पुजारीला काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली असून, नाशिकच्या गुन्ह्यात रवी पुजारीला शुक्रवारी (दि.२३) विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्यासमोर युक्तिवाद होऊन सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली व बांधकाम व्यावसायिकाला पुजारी याने दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सादर करून त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी तसेच उर्वरित दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी पाेलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता, न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ऑर्थर रोडहून आणले न्यायालयात
गँगस्टर रवी पुजारी सध्या ऑर्थर रोड कारागृहात असून, शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास मुंबई पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्त व पुरेपूर गोपनीयता पाळत सहायक पोलीस आयुक्त सोपान निगोट व सुमारे पन्नास सशस्त्र पोलिसांनी नाशिक न्यायालयात सव्वाअकरा वाजता हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पुन्हा त्याला मुंबईला नेण्यात आले.