नाशिकला पेरूच्या मळ्यात गुंडाचा जुगाराचा अड्डा, पोलिसांकडून उद्धवस्त
By अझहर शेख | Published: October 19, 2023 02:56 PM2023-10-19T14:56:55+5:302023-10-19T14:57:14+5:30
१४ जुगारी ताब्यात : ११ दुचाकी, पाच कार, एक रिक्षा जप्त
नाशिक : पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी गावाच्या शिवरातील पेरूच्या मळ्यात जुगाराचा मोठा अड्डा चालविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक तयार करून घटनास्थळी पाठवत बुधवारी मध्यरात्री (दि.१८) धाड टाकली. यावेळी १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात यश आले, तर काही पळून गेले. या जुगार अड्ड्यावर उभ्या केलेल्या ११ दुचाकींसह पाच कार, एक रिक्षा तसेच पंधरा ते वीस मोबाइल असा सुमारे १३ लाख ३२ हजार २८५रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
टिप्पर गँगचा म्होरक्या संशयित सराईत गुन्हेगार समीर पठाण हा जागामालक संशयित प्रकाश बांदेकर यांच्या पेरूच्या मळ्यात जुगाराचा अड्डा काही महिन्यांपासून चालवत होता. याबाबत राऊत यांना गोपनीय माहिती बुधवारी रात्री मिळाली. त्यांनी स्वतंत्र पथक तयार करून दोन पंचांसह पेरूच्या मळ्यात रवाना केले.
पोलिसांच्या पथकाने रात्री साडे ११वाजेच्या सुमारास जुगार खेळविला जात असलेल्या जागेभोवती वेढा दिला. यावेळी २० ते २५ इसम याठिकाणी ५२पत्ती कॅटचा जुगार खेळत होते. सगळ्यांना जागेवरच थांबून राहण्यास सांगितले असता काहींनी अंधारातून शेतात पळ काढला. यावेळी संशयित जागामालक बांदेकरसह १४ जुगाऱ्यांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत सरकारी वाहनात डांबले. हे जुगारी सगळे ३५ ते ७० वयोगटातील श्रमिक वर्गातील लोक आहेत.
सर्वांची अंगझडती घेत मोबाइल, रोख रक्कम जप्त करण्यात आली. यावेळी एकुण ८५ हजारांची रोकड पोलिसांना सापडली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल सीलबंद करून जप्त केला. तसेच पत्र्याच्या शेडसमोर शेताच्या मोकळ्या जागेत उभी केलेली १८वाहनेही जप्त करून इंदिरानगर पाेलीस ठाण्यात आणली. या जुगाऱ्यांवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पठाण हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल
रिक्षाचालक संशयित दिलीप कराड (५७), मोहन मोरे (५१), मजूर दीपक पारधी (३८), मजुर सलीम शेख (४५), एजंट सुनीलल सांगगोरे (५६), हेमंत काळे (४०), हसन शेख (५५), एजंट हनीफ शेख (५०), नासिर सय्यद (५०), रमेश वाणी (७०), योगेश चौथरे (४२), सुमित साळवे (२९), दादू खोडे (४२), गयास शेख (६०