घुंगुरांनी मृत्यूच्या दारात पोहचविलेल्या चार वर्षांच्या माकडीणीला मिळालं जीवदान
By अझहर शेख | Published: September 11, 2017 11:59 AM2017-09-11T11:59:46+5:302017-09-11T12:01:58+5:30
नाशिक, दि. 11 - प्रेमापोटी नाही तर स्वार्थासाठी माकडीण पाळली आणि तिच्या गळ्यात घुंगरूही बांधले. तिला अंगा-खांद्यावर घेऊन गावोगावी ...
नाशिक, दि. 11 - प्रेमापोटी नाही तर स्वार्थासाठी माकडीण पाळली आणि तिच्या गळ्यात घुंगरूही बांधले. तिला अंगा-खांद्यावर घेऊन गावोगावी फिरवलं. पण कालांतराने एका अज्ञात दरवेशीने अवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या माकडीणीला बेवारस सोडून दिलं. दरवेशीने गळ्यात बांधलेले घुंगरू त्या लहानग्या माकडीणीच्या जीवावर बेतले होते.
घुंगरांमुळे त्या माकडीणीचा कोवळा गळा कापला गेला आणि मोठी जखम झाल्याने सदर माकडीण मृत्यूशय्येवर पोहचून ‘नंदिनी’च्या कुशीत निद्रिस्तावस्थेत आढळून आली. मानवाचे आकर्षण ठरलेल्या माकडाचा दरवेशी आजही कुठे ना कुठे ‘खेळ’ करतात. दरवेशींचा उदरनिर्वाह माकडांमुळे होत असला तरी त्या मुक्या जीवाच्या जीवनाचा ‘खेळ’ होतो. कारण माकड हा वन्यजीव असून, त्याला निसर्गाच्या कुशीत मुक्तपणे वावरण्यास आवडते आणि हाच त्याचा अस्सल नैसर्गिक अधिवासही आहे. दरवेशीच्या तावडीतून सुटका करून घेतलेली किंवा त्याने वाऱ्यावर सोडलेली एक माकडीण तिडके कॉलनीच्या परिसरात नंदिनी अर्थात नासर्डीच्या काठावर मरनासन्न अवस्थेत असल्याची माहिती नाशिक पश्चिम वनविभाग व ‘इको-एको’च्या स्वयंसेवकांना मिळाली. वनरक्षक आणि स्वयंसेवकांनी सदर ठिकाणी जाऊन त्या माकडिणीला साधारणत: महिनाभरापूर्वी ‘रेस्क्यू’ केले.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी तत्काळ डॉ. संजय महाजन, डॉ. संजय गायकवाड यांना पाचारण करून माकडीणीवर वैद्यकीय उपचार सुरू केले. जखम खोलवर गेल्यामुळे माकडीण जगणार की नाही? याविषयी सर्वांच्या मनात भीती होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आणि औषधोपचार सुरू केले. माकडीणीने औषधोपचाराला प्रतिसाद दिला. महिनाभरात माकडिणीच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
{{{{dailymotion_video_id####x845b3o}}}}