स्टॅण्डअप कॉमेडीमध्ये गांगुर्डे विजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:32 AM2019-07-18T00:32:14+5:302019-07-18T00:32:41+5:30
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे.
नाशिक : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे. दोन्ही विजेत्यांना सांस्कृतिक संचालक मीनल जोगळे व प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रावसाहेब थोरात सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय स्पर्धा रंगली. १२ वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत घेण्यात येणार असून नाशिकपासून या स्पर्धेची सुरुवात झाली. मविप्रचे संचालक नानासाहेब महाले, सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे, परीक्षक अनिल सोनार, संजय कळमकर, श्याम राजपूत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. नाशिकमधून एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात पुढारी पाहिजे या वगनाट्यातील प्रसंगातील कवी आणि रोंगट्या यांच्यातील ग्रामीण शैलीतील संवाद सादर करीत विजेतेपद पटकविणाऱ्या अर्चना गांगुर्डे यांना २० हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तर वटवट या विनोदी लेखातील अण्णा आणि भाचा यांच्यातील संवादाच्या प्रसंग सादर करीत उपविजेतेपद पटकविणाºया उमेश सोनवणे याला १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कलाकारांच्या धम्माल सादरीकरणाने रंगत
एकांकिका, नाटक, कथा, ललितलेख अशा पुलंच्या साहित्यावर आधारित फुलराणी नारायण, वटवट्या अशी पात्रे कलाकारांनी रंगवली, तर काही कलाकारांनी पुलंची कविता समजून दुसºयाच साहित्यिकाची कविता सादर केली. त्यावर परीक्षकांनी निरीक्षण नोंदवत कलाकारांनी कलाकृतीचे सादरीकरण करताना केवळ सोशल मीडियावरील कविता अथवा कलाकृतीचा आधार न घेता स्वत: वाचन करून साहित्यातील प्रसंग निवडण्याचा सल्ला दिला.