निवडणूक शाखेला गणपती बाप्पा पावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:02 AM2018-09-25T00:02:48+5:302018-09-25T00:03:07+5:30
१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत गणेशोत्सव काळात करण्यात आलेल्या व्यापक प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत २२ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, सरासरी दिवसाला एक हजार याप्रमाणे मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक शाखेची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
नाशिक : १ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत गणेशोत्सव काळात करण्यात आलेल्या व्यापक प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत २२ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, सरासरी दिवसाला एक हजार याप्रमाणे मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक शाखेची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून, या याद्या मतदारांना अवलोकनासाठी प्रत्येक तहसील, निवडणूक शाखा, मतदार केंद्रावर ठेवण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता आयोगाने १ सप्टेंबरपासूनच मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरू केली असून, त्यात मतदार जागृती, नवीन मतदारांची नोंदणी, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. विशेष करून जानेवारी २०१९ मध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची संख्या वाढविण्याचा विचार आयोगाचा असून, त्यासाठी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मतदार नाव नोंदणीचे अर्ज ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ६७ महाविद्यालयांची त्यासाठी निवड करण्यात आली. याशिवाय मतदार जागृती चित्ररथ फिरविला जात असल्याने गणेशोत्सव काळात सार्वजनिक मित्रमंडळांनीही राष्टय कर्तव्य म्हणून मतदार जागृतीला हातभार लावला आहे. गेल्या तेवीस दिवसांत जिल्ह्यात २२ हजार नवीन मतदारांनी आपले अर्ज भरून दिले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सध्या निवडणूक नोंदणी अधिकारी प्रत्येक महाविद्यालयाशी संपर्क ठेवून आहेत, त्यामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत मतदारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.