चॉकलेट आवडे गणपती बाप्पाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:41+5:302021-09-14T04:17:41+5:30
नाशिक : चाॅकलेट मोदक, चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक, चोकोलावा मोदक अशी लाडक्या बाप्पासाठी मोदकांची वेगळीच रेंज सध्या बाजारात उपलब्ध असून, ...
नाशिक : चाॅकलेट मोदक, चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक, चोकोलावा मोदक अशी लाडक्या बाप्पासाठी मोदकांची वेगळीच रेंज सध्या बाजारात उपलब्ध असून, पारंपरिक मोदकांबरोबरच लहानग्यांच्या आवडत्या चॉकलेट प्रकारातील मोदकांना प्रचंड मागणी आहे. अर्थात, यंदा बाप्पाचा नैवेद्य महाग झाला असून, त्यामुळे महागाई दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.
अबाल वृद्धांचा लाडका बाप्पा नुकताच विराजमान झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे गणेशेात्सवाला अपेक्षित प्रतिसाद नव्हता. मात्र, यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरोघर बाप्पाचा उत्सव साजरा केला जात आहे. गणरायाला लाडका नैवेद्य म्हणजे मोदक. खिरापतीचे सारण असलेल्या पारंपरिक मोदकांपासून उकडीचे मोदक, खव्याचे मोदक असे नेहमीचे मोदकांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्या पलीकडे हापूस आंब्याचे मोदक, काजू मोदक, केसर मोदक, मावा मोदक, ड्रायफ्रूट मोदक बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्याच बरोबर हापूस आंब्याचे मोदक खास कोकणातून नाशकात दाखल झाले आहेत. खास हापूस अंब्याचा अर्क टाकून हे माेदक तयार केले जातात. त्यांनाही चांगली पसंती मिळत आहे. मात्र, बालगोपाळांच्या दृष्टीने सर्वाधिक आकर्षण चॉकलेट मोदकाचे ठरले आहे.
दरवर्षी चॉकलेट मोदक बाजारात असतातच. परंतु यंदाही चॉकलेट माेदक, चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक तसेच चोकोलावा असे वेगवेगळे प्रकार देखील दाखल झाले आहेत. बाप्पाला नैवैद्य आणि बालगोपाळांना प्रसाद म्हणून या नैवैद्याला खास मागणी असल्याचे विविध मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. साधारण पाचशे रुपये किलो असे या चाॅकलेट मोदकाचे प्रति किलो दर आहेत.