गावठाण क्लस्टर प्रस्ताव अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:32 AM2020-07-03T00:32:23+5:302020-07-03T00:33:38+5:30
शहरातील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने आखलेली क्लस्टर योजना कोरोना लॉकडाऊनमुळे रखडली होती. मात्र, आता ही योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
नाशिक : शहरातील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने आखलेली क्लस्टर योजना कोरोना लॉकडाऊनमुळे रखडली होती. मात्र, आता ही योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात शुक्रवारी (दि. ३) आॅनलाइन बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. गावठाणातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.
गावठाण भागातील ढासळते वाडे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. दर पावसाळ्यात पंधरा ते वीस वाडे पडतात. त्यामुळे जीवित आणि वित्तहानीदेखील होत असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी गावठाण भागात ज्यादा चटई क्षेत्र वाढवून देण्याची मागणी होत आहे.
२०१७ मध्ये शासनाने शहर विकास आराखडा मंजूर केला तेव्हा गावठाण भागात क्लस्टर राबविण्यासाठी वेगळी तरतूददेखील केली आहे. त्यानुसार महापालिकेकडे आघात मूल्यमापन अहवाल मागविण्यात आला होता. गेल्यावर्षी यासंदर्भातील निविदा मंजूर झाली. त्यावेळी ड्रोनने सर्वेक्षण करण्यात अडचणी आल्या. आता सल्लागार संस्थेचे हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता शासनाला अहवाल पाठविण्यात येणार आहे.
सदरचा अहवाल पाठवितांना त्यात गावठाण भागातील लोकप्रतिनिधींचे मत जाणून तेदेखील शासनाला कळविण्यात येणार असल्याने यासंदर्भात शुक्रवारी (दि.३) लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेऊन पाठविले जाणार आहे. त्यासाठी आॅनलाइन बैठकीचे नियोजन आहे. त्यानंतर महिनाअखेरीस हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
शाहु खैरे यांची टीका
गावठाण भागात क्लस्टर सुरू करा, अशी मागणी करून लोकप्रतिनिधी थकले आहेत. निम्मे वाडे ढासळले आहेत. परंतु प्रशासन मात्र वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याची टीका कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी केली आहे. गावठाण भागात चार चटईक्षेत्र लागू करण्याचा प्रस्ताव शहर विकास आराखड्यात होता. मात्र तो मंजूर झाला नाहीच उलट शासनाने गावठाण भागात दीड एफएसआय केल्याचा आरोप खैरे यांनी केला.