गावठाण भूमापन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:26 AM2021-03-04T04:26:04+5:302021-03-04T04:26:04+5:30
मालेगाव : ड्रोनव्दारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी व लोकाभिमुख असल्याचे प्रतिपादन प्रातांधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी ...
मालेगाव : ड्रोनव्दारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी व लोकाभिमुख असल्याचे प्रतिपादन प्रातांधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी केले आहे. तालुक्यातील दाभाडी येथे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन प्रकल्पाचे उद्घाटन प्रातांधिकारी विजयानंद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शर्मा म्हणाले की, प्रकल्पामुळे शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होईल. गावातील घरे, रस्ते, शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळकतींचा नकाशा तयार होईल. कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिकेच्या स्वरूपात तयार होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल. मिळकत पत्रिकेमुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल. भूमापनाची कार्यपध्दती पारदर्शकपणे राबवून ग्रामस्थांना त्यांचे अधिकार अभिलेख सहज व सुलभपणे उपलब्ध होतील. प्रशासकीय नियोजनासाठी गावठाण भूमापन नकाशे उपलब्ध होतील. उत्पन्नाचे स्रोत निश्चित होऊन गावठाणातील जमिनीच्या हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद मिटविण्यासाठी भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होणार आहे. गावठाण भूमापन योजना अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त योजना असून, सर्व ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन ग्रामसेवक व भूकरमापकांच्या मार्गदर्शनाखाली चुना पावडरच्या सहाय्याने वेळेत पूर्ण करून या योजनेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रातांधिकारी शर्मा यांनी केले आहे. यावेळी उपसरपंच अविनाश निकम, रावसाहेब निकम, प्रमोद निकम, उपअधीक्षक भूमी अभिलेख भगवान शिंदे, जितेंद्र पाटील, अतुल खैरनार, सर्वेअर संतोष वाघ, शशी किरण आदी उपस्थित होते.
---------------------
८९ महसुली गावांचे सर्वेक्षण
या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १५२ गावांपैकी गावठाण भूमापन न झालेल्या ८९ महसुली गावांचे सर्वेक्षण करून या सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख व गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे, असे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.