वातावरणात गारठा : नाशिककरांना १२ वाजता घडले सुर्यदर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:03 PM2020-01-04T15:03:51+5:302020-01-04T15:07:17+5:30
थंडीचा कडाका वाढला असून बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.
नाशिक : ढगाळ हवामान...सुटलेला थंड वारा... घसरलेला किमान तापमानाचा पारा अशा वातावरणाचा सध्या नाशिककर आठवडाभरापासून अनुभव घेत आहे. शनिवारी (दि.४) चक्क नाशिककरांना सुर्योदय झाला की नाही, हे दुपारी १२ वाजेपर्यंत लक्षातच आले नाही, कारण पहाटेपासून दाटलेले मळभ हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास काहीसे हटले आणि सुर्यकिरणे जमिनीवर पडली. त्यामुळे नाशिककरांनी पहाटेपासून दुपारपर्यंत थंडीचा कडाका अनुभवला.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली. या हंगामातील निचांकी १०.३ अंशापर्यंत पारा घसरला. यामुळे नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले. पहाटेपासून नाशिककरांना हुडहुडी भरली होती. तसेच दिवसभर नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली. बुधवारी तापमानाचा पारा ११.६ अंशापर्यंत मोजला गेला. शुक्रवारी किमान तापमान ११.२ अंश इतके होते. डिसेंबरअखेर १३ अंशापर्र्यंत किमान तापमानाचा पारा स्थिरावत होता; मात्र नवीन वर्ष उजाडताच पारा थेट १० अंशापर्यंत खाली घसरला. याबरोबरच कमाल तापमानदेखील २८ अंशावरून शुक्रवारी थेट २६अंशापर्यंत खाली आले. यामुळे नाशिककरांना सध्या दिवसाही वातावरणता कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. नागरिक दिवसाही स्वेटर, हाफ जॅकेट परिधान करून दैनंदिन कामे आटोपताना दिसून येत आहे. चाकरमान्यांनी कार्यालयांमध्ये उबदार कपडे परिधान करूनच कामे उरकण्यास प्राधान्य दिले. दुपारी दोन वाजेपासून शहरात पुन्हा ढग दाटून येऊ लागले. सुर्यप्रकाश फारसा कडक पडत नसल्याने वातावरणात गारवा टिकून आहे. अधुनमधुन सुर्य ढगाआड जात असल्याने थंडीची तीव्रता कायम असल्याचे दिसून येत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. नव्या वर्षाचा पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरमध्ये बफवृष्टी जोरदार सुरू असून तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारत गारठला आहे. परिणामी या वातावरणाचा परिणाम उत्तर महाराष्टÑासह विदर्भ, मराठवाड्यावरही होऊ लागला आहे. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही परिणाम होताना दिसून येत आहे.
सर्दी-पडसे, खोकल्याचे रूग्ण वाढले
थंडीचा कडाका वाढला असून बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. परिणामी खासगी दवाखान्यांसह सार्वजनिक रूग्णालयांमध्येही रूग्णसंख्या वाढली आहे. नागरिकांनी बदलत्या हवामानाच्या त्रासापासून बचाव करताना पाणी उकळून प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल बांधावा किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी न विसरता परिधान करावी, असे डॉक्टर सांगतात.