राज्यातील महानगरांमध्ये कचरा वर्गीकरण हीच मोठी समस्या: सुलक्षणा महाजन
By संजय पाठक | Published: March 9, 2019 11:24 PM2019-03-09T23:24:31+5:302019-03-09T23:26:45+5:30
महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले.
नाशिक - केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत नुकताच निकाल घोषीत झाला आणि त्यात राज्यातील अनेक मोठ्या सक्षम महापालिकांची घसरण झाली. नाशिक महापालिकेचा क्रमांक ६३ वरून ६७ वर घसरला तर राज्यात विसावा क्रमांक आला. त्यामुळे नाशिकसह राज्यातील विविध महापालिकांच्या स्वच्छतेविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले. महाजन यांचा नगररचनेबाबत प्रचंड अभ्यास असून शासनाच्या अनेकविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. मुख्य म्हणजे रेराच्या रचनेसाठी देखील त्यांनी योगदान दिले आहे.
प्रश्न : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात महाराष्टÑातील अनेक महापालिका मागे पडल्या त्याचे काय कारण आहे असे वाटते?
महाजन : राज्यातील सर्व महापालिकेची गुणांचे तक्ते माझ्याकडे नाहीत. परंतु अनेक त्रुटींमुळे महापालिका मागे पडत आहेत हे मात्र नक्की. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही त्याच प्रमाणे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प अनेकांनी योग्य पध्दतीने राबविलेले नाहीत. शास्त्रोक्त पध्दतीने कचºयाची विल्हेवाट हा खूप मोठा भाग आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच शहरे मागे पडत आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे बहुतांशी महापालिकांनी घन कचरा व्यवस्थापनासाठी युजर चार्जेस आकारलेले नाहीत. त्या सर्व पार्श्वभूमीवर विचार करण्याची वेळ आली आहे.
प्रश्न : स्वच्छतेबाबत महाराष्टÑातील महापालिका या अन्य शहरांशी स्पर्धा वाढली म्हणून मागे पडत आहेत असे वाटते का?
महाजन : केंद्र शासनाने शहराची संख्या वाढविली असली तरी त्यांचे नगरपालिकांची स्वतंत्र कॅटेगिरी आहे. यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा संबंधच येत नाही. परंतु, दोन्हींसाठी निकष सारखेच आहेत त्यात बदल करावा असे वाटत नाही. परंतु एकंदरच स्वच्छतेविषयी अपुरे प्रयत्न होतात. त्यात सुधारणा करणे गरजेचे आहेत. मुळात नगरपालिकांचे क्षेत्र छोटे आहे म्हणून त्यात चांगली स्वच्छता करता येते आणि मोठी शहरे असल्यास स्वच्छता करता येत नाही असे म्हणणे मला योग्य वाटत नाही. जगात अनेक मोठी शहरे आहेत आणि त्यात चांगली स्वच्छता असते. त्यामुळे स्वच्छतेला महत्व आहे असे मला वाटते.
प्रश्न: राज्यातील महापालिकांनी भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी काय केले पाहिजे असे वाटते?
महाजन: महापालिकांनी स्वच्छ शहर स्पर्धेसाठी चांगले काम केले पाहिजे. विशेषत: ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण नागरीकांनी केले पाहिजे आणि त्याच बरोबर महापालिकेने देखील त्याच धर्तीवर पुढे नेले पाहिजे. कचरा वर्गीकरण न केल्यास त्याला हजार रूपये दंड असून त्याचा वापर महापालिकांनी करायला हवा. त्याच बरोबर रस्त्यात कचरा टाकण्याचे प्रकार नागरीकांनी टाळले पाहिजे. नागरीकांची मानसिकता बदलणे हे सर्वात मोठे आव्हान आहे असे मला वाटते.
मुलाखत- संजय पाठक