उद्यान देखभाल ठेका, अटी-शर्ती शिथिल
By admin | Published: December 17, 2015 12:42 AM2015-12-17T00:42:44+5:302015-12-17T00:43:21+5:30
मागणीचा विचार : बचत गटांना दिलासा
नाशिक : महापालिकेने शहरातील २८६ उद्यानांच्या देखभालीसंदर्भात निविदाप्रक्रिया राबविण्याचे ठरविले; परंतु महिला बचतगटांसाठी सदर निविदा प्रक्रियातील अटी जाचक ठरत असल्याने प्रशासनाने आता अटी-शर्ती शिथिल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
महापालिका आयुक्तांनी शहरातील २८६ उद्यानांच्या देखभालीसंबंधी एकत्रित ठेका देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मांडला होता. परंतु सदर ठेका एकत्रित न काढता तो महिला बचतगटांना द्यावा, असा निर्णय महापौरांनी जाहीर केला होता. महासभेच्या निर्णयानंतर प्रशासनाने सदर ठेक्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली; परंतु एखादी कंपनी नजरेसमोर ठेवून तयार केलेल्या प्रस्तावातील जाचक अटींमुळे त्याला अल्प प्रतिसाद लाभला.
प्रशासनाला त्यासाठी फेरनिविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. महिला बचतगट यांची आर्थिक कुवत लक्षात घेऊन सदर निविदेतील अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्यानुसार प्रशासनाने अटी-शर्ती शिथिल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ३७ उद्यानांसाठी महिला बचतगटांनी प्रतिसाद नोंदविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.