बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक
By admin | Published: September 16, 2016 10:39 PM2016-09-16T22:39:42+5:302016-09-16T22:39:55+5:30
येवला : विश्वलता महाविद्यालयातील श्रींचे कृत्रिम कुंडात विसर्जन
येवला : श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित येथील विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विराजमान असलेल्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
विद्यालयातर्फे गणपती बाप्पाची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. तरुणींचे लाठी-काठी पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने बाप्पाची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती.
श्रींची आरती संस्थेचे सचिव प्रशांत भंडारे यांनी सपत्नीक केली. नंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना पारंपरिक असे ग्रामीण भागातील प्रमुख वाद्य संबळ आणि बाजाचा नाद मनाला वेगळीच ऊर्मी देत होता. संस्थेचे विश्वस्त भूषण लाघवे यांचा सक्रीय सहभाग आणि विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह व आनंद कोणाच्याही नजरेतून सुटला नाही.
संपूर्ण गावभर महाविद्यालयाच्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीचे कौतुक आणि महाविद्यालयाच्या शिस्तीची चर्चा ऐकावयास येत होती. प्रवीण ठाकरे या विद्यार्थ्यांने केलेला संभाजी महाराजांचा पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
महाविद्यालय परिसरात तयार केलेल्या कृत्रिम कुंडात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर या व अशा जयघोषांनी परिसर दणाणून सोडला होता.
या वेळी विश्वस्त भूषण लाघवे, उपप्राचार्य ज्ञानदेव कदम, शीतल बोरसे, मधुरा क्षित्रय दुर्गा खडके, प्रतीक्षा वाळके प्राजक्ता बोरणारे, साक्षी पटेल उपस्थित होते. गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)