गॅस सिलिंडर नोंदणीचा गोंधळ कायम
By Admin | Published: January 8, 2015 12:46 AM2015-01-08T00:46:07+5:302015-01-08T00:46:17+5:30
पुरवठा खात्याचे तेल कंपनीला पत्र : जबाबदारीची जाणीव
नाशिक : गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकाच्या बॅँक खात्यात जमा करण्याच्या तेल कंपन्यांनी १ जानेवारीपासून घेतलेल्या निर्णयामुळे गॅस नोंदणीबाबत निर्माण झालेला गोंधळ दहा दिवसांनंतरही कायम असून, त्यासंदर्भात ग्राहकांची होणारी ओरड लक्षात घेता, जिल्हा पुरवठा खात्याने तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींना पत्र पाठवून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
जिल्ह्यात अकरा लाखांहून अधिक गॅसधारक असून, त्यापैकी साडेचार लाख ग्राहकांनी बॅँकेत खाते उघडून त्याबाबतची माहिती गॅस कंपनीकडे सादर केली आहे. अशा ग्राहकांचे गॅस सिलिंडर अनुदान १ जानेवारीपासून बॅँकेत जमा करण्यास सुरुवात झाली आहे, तर सुमारे साडेसहा लाख ग्राहकांनी लवकरात लवकर बॅँकेत खाते उघडून त्याची माहिती गॅस कंपनीला द्यावी यासाठी तेल कंपन्यांनी प्रयत्न चालविले आहेत; परंतु हे सारे करत असताना गॅस ग्राहकांची माहिती साठवून ठेवणाऱ्या सॉफ्टवेअरचे काम तेल कंपन्यांनी ३० डिसेंबरपासून हाती घेतल्याने व ते अद्यापही चालूच असल्याने भ्रमणध्वनीवरून लघुसंदेशाद्वारे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडे गॅस सिलिंडरची नोंदणीच होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. यासंदर्भात हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी) गॅस वितरकांकडे चौकशी केली असता, त्यांनी चक्क तेल कंपनीकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिणामी नोंदणीच होत नसल्याने गॅस ग्राहकाला सिलिंडर मिळणे मुश्कील झाले आहे. तेल कंपनीच्या विक्री प्रतिनिधींकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. दहा दिवस उलटूनही या सर्व परिस्थितीतून कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी बुधवारी तेल कंपन्यांना पत्र पाठवून गॅस सिलिंडर नोंदणीच्या गोंधळामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार धरण्याची तंबी दिली आहे. ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तेल कंपन्यांची असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेऊ नये असे बजावून, गॅस वितरकाकडे ग्राहकांकडून बॅँक खाते व आधारबाबत माहिती घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा विविध सूचना करणारे लेखी पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)