मानेनगरला गॅस गळती होऊन सिलिंडरचा भीषण स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:42 AM2021-12-17T01:42:26+5:302021-12-17T01:43:03+5:30
मेरी रासबिहारी लिंक रोडवर असलेल्या मानेनगरला गुरुवारी (दि.१६) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिवपुष्प रो हाऊस येथे पत्र्याच्या खोलीत गॅस गळती होऊन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटामुळे घरात आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
पंचवटी : मेरी रासबिहारी लिंक रोडवर असलेल्या मानेनगरला गुरुवारी (दि.१६) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिवपुष्प रो हाऊस येथे पत्र्याच्या खोलीत गॅस गळती होऊन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटामुळे घरात आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मानेनगर परिसरात अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाचे के. के. वाघ केंद्राच्या जवानांनी धाव घेत घराला लागलेली आग आटोक्यात आणत घरातून एक गॅस सिलिंडर बाहेर काढले. तत्पूर्वी भरवस्तीत घडलेल्या घटनेनंतर नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेनगर परिसरात असलेल्या शिव पुष्प रो हाऊस येथे मनीषा तुषार काळे यांच्या मालकीचे २१ क्रमांकाचे रो हाऊस आहे. या रो हाऊसला लागूनच काळे यांनी पत्र्याची खोली बांधलेली आहे. त्या खोलीत त्यांचा मानलेला भाऊ विठ्ठल गुणाजी बोरकर हा राहतो. बोरकर हा व्यवसायाने टेलरिंग काम करणारा असून गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून घराबाहेर पडल्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास बोरकर यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काळे यांच्या मुलांच्या लक्षात आले. त्यावेळी मुलांनी त्यांचा मामा राकेश साबळे यांना माहिती दिली. साबळे यांनी तत्काळ रो हाऊसमधील लहान मुले व इतरांना घराबाहेर काढून घरातील सिलिंडर बाहेर काढत अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यामुळे के. के. वाघ अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन दलाची गाडी काही अंतरावर असताना सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे घरातील कपडे, पलंग व इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून राख झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा करून घरातील एक सिलिंडर बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख एस. बी. निकम, वाहनचालक जी. ए. धोत्रे, आर. डी. सोनवणे, पी. जी. चव्हाणके, शाम काळे आदींनी आग विझविली.