शहरात आता बसविणार वायू शुद्धीकरण उपकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:20 AM2019-06-20T01:20:15+5:302019-06-20T01:20:32+5:30
शहरातील वाहतूक सुधारणा करतानाच वायू प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रमुख मार्गांवरील जंक्शनमध्ये एअर प्युरिफायर यंत्र बसवण्यात येणार आहे. नाशिकमधील अनेक कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून हे मीटर बसविण्याची तयारी दर्शविली आहेच,
नाशिक : शहरातील वाहतूक सुधारणा करतानाच वायू प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रमुख मार्गांवरील जंक्शनमध्ये एअर प्युरिफायर यंत्र बसवण्यात येणार आहे. नाशिकमधील अनेक कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून हे मीटर बसविण्याची तयारी दर्शविली आहेच, परंतु महापालिकेने वाहतूक बेट आणि रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी प्रायोजकत्व देतानाच ही अट यापुढे घातली जाणार आहे. शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मोबिलीटी सेलच्या बैठकीत हा निर्णय बुधवारी (दि.१९) घेण्यात आला.
या सेलची बैठक आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली तिडके कॉलनीतील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क येथे ही बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच अन्य शासकीय खात्यांचे प्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते. सध्या नाशिक शहरात वायूप्रदूषण वाढत असून, शासन स्वीत्झर्लंड सरकारच्या मदतीने नाशिकची हवा बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातच आता मोबिलीटी सेलच्या माध्यमातून हवा शुद्धीकरणाची तयारी सुरू आहे. साधरणत: सव्वा लाख रुपयांचे हे यंत्र असून ते निरी या शासन अंगीकृत संस्थेने विकसित केले आहे. दरम्यान, नाशिक शहरात मेट्रो बस सुरू करण्यात येणार असून, त्यासंदर्भात विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गतच नाशिकमधील विविध संस्था म्हणजेच स्टेक होल्डरसाठी येत्या २९ जून रोजी कालिदास कलामंदिरात सादरीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी वाहतुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शहरात वाहतूक बेटाची १३ कामे सुरू आहेत. सध्या ३३ प्रस्ताव दाखल असून, त्याचीदेखील कार्यवाही केली जात आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरील दहा वाहतूक कमानी महेंद्र कंपनीमार्फत सुशोभिकरणाचा प्रस्ताव आहे.
पारिजातनगर येथे सिग्नल
शहरात महात्मानगरकडे जाताना असलेल्या पारिजातनगर आणि वडाळा रोडवर अशोका युुनिव्हर्सल स्कूलजवळ सिग्नल बसविण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. अन्य प्रस्तावांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन छाननी करण्याचे ठरविण्यात आले.