सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:54+5:302021-05-07T04:15:54+5:30
नाशिक : देशातील पाच राज्यांमधील निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू झाली असून, सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल ...
नाशिक : देशातील पाच राज्यांमधील निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू झाली असून, सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात दरवाढ केली आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि. ४) ९७.४२ रुपयांपर्यंतचे असलेले पेट्रोल गुरुवारपर्यंत ४२ पैशांनी, तर ८७.१० रुपयांपर्यंत असलेले डिझेल ५३ पैशांनी महागले आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढीचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारीला पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली होती. त्यानंतर काही पैशांची घसरण झाल्यानंतर आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, यापूर्वी १५ एप्रिल रोजी पेट्रोल ९७.१८, तर डिझेल ८६.८२ रुपयांनी विकले गेले होते.
तीन दिवसात अशी झाली दरवाढ
वार - पेट्रोल - डिझेल
मंगळवार - ९७.२४ - ८७.१०
बुधवार - ९७.६० - ८७.३२
गुरुवार - ९७.८४ -८७.६३