मालेगावी मनपाच्या मानधन कर्मचाऱ्यांचे गेटबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 03:51 PM2021-07-01T15:51:59+5:302021-07-01T15:52:35+5:30
मालेगाव :- महापालिकेने मानधन तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप करीत सफाई कर्मचाऱ्यांनी बहूजन समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१) दुपारी मनपाजवळ गेटबंद आंदोलन केले.

गेल्या अनेक वर्षापासून शेकडो महिला व पुरुष सफाई कामगार मानधनावर काम करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात या कामगारांनी जीवावर उदार होत सफाईची कामे केलीत. मात्र, मनपा अधिकारी व काही लोकप्रतिनिधींनी खाजगी ठेकेदाराच्या फायद्यासाठी या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना खाजगी ठेकेदारांकडे वर्ग करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप प्रदेश सचिव आनंद आढाव यांनी केला.
शासनाने ३ जून २०२१ रोजी परिपत्रक काढून सर्व मानधन कर्मचाऱ्यांना आस्थापना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांना कायम करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष सुनील पवार, राजू जाधव, दिलीप पाथरे यांच्यासह सफाई कामगार सहभागी झाला होते.