गौरव : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा
By admin | Published: July 22, 2014 10:45 PM2014-07-22T22:45:03+5:302014-07-23T00:25:38+5:30
मालेगावातील चार लेखकांची निवड
मालेगाव : महाराष्ट्र राज्य शासन उर्दू साहित्य अकादमीच्या सन २०१३च्या वार्षिक पुरस्कारांसाठी येथील चौघा लेखकांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
येथील प्रख्यात लेखक व उर्दू शायर डॉ. इलियास सिद्दिकी, मुख्याध्यापक व लेखक अश्पाक उमर, ए.टी.टी. हायस्कूलचे शिक्षक डॉ. एकबाल बर्की व लेखक जाहीद अख्तर यांची या पुुरस्कारांसाठी निवड झाली आहे. डॉ. सिद्दिकी यांना त्यांच्या ‘कंदील हर्फ’ या गझल व शेरोशायरीच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ‘मालेगावचा इतिहास’ लिहिणारे लेखक म्हणून सिद्दिकी यांचा परिचय आहे.
येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक ६४ चे मुख्याध्यापक अश्पाक उमर यांनी
‘रहनुमाई सिव्हिल सर्व्हिसेस’ हे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनसंदर्भातील पुस्तक उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. त्यांच्या या पुस्तकाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापक उमर हे पुस्तकप्रेमी असून, त्यांच्याकडे गत शंभर वर्षांतील मराठी व उर्दू भाषेतील क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध आहेत. मुख्याध्यापक उमर यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तिसरे पुरस्कारार्थी हे येथील ए.टी.टी. हायस्कूलमधील माध्यमिक शिक्षक डॉ. एकबाल बर्की हे आहेत. त्यांच्या ‘उस्ताद की नसीहत’ या बालकादंबरीची यंदाच्या या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २००९ मध्येही बर्की यांच्या ‘मोती’ या पुस्तकासही राज्य शासनातर्फे सदर पुरस्कार देण्यात आला होता. डॉ. बर्की यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. चौथे पुरस्कारार्थी जाहिद अख्तर हे आहेत. त्यांनी गुलबुटे या मुंबईतील उर्दू बालमासिकातून उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखन केले. तसेच या मासिकातून विविध स्पर्धा परीक्षांविषयीची माहितीदेखील त्यांनी बालविद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांची सदर पुरस्कारांसाठी निवड केली आहे.