गौरव गिल ठरला विजेता
By Admin | Published: June 16, 2014 12:38 AM2014-06-16T00:38:31+5:302014-06-16T01:03:24+5:30
नाशिक : महिंद्र अॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रच्या इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा विजेता अपेक्षेप्रमाणे दिल्लीचा गौरव गिल - मुसा शरीफ ही जोडी ठरली.
नाशिक : महिंद्र अॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रच्या इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा विजेता अपेक्षेप्रमाणे दिल्लीचा गौरव गिल - मुसा शरीफ ही जोडी ठरली. शंभर सेकंदाची शिक्षा मिळूनही त्याने गतविजेत्या अमितरजित घोषवर आघाडी घेत पहिल्या फेरीच्या विजेत्या पदाला गवसणी घातली. दरम्यान, स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या नाशिककर धीवर बंधूंनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदविली.
गेल्या शुक्रवारपासून विसा आयोजित महिंद्र अॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. फाळके स्मारकात पहिली स्टेज झाल्यानंतर शनिवारपासून सिन्नर - घोटी - अकोला परिसरातील सह्णाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्पर्धा पार पडली. पहिल्या दिवसाच्या सहा स्टेजमध्ये गतविजेता कोलकात्याचा अमितरजित घोष व विजेतेपदाचा प्रबळ दावेदार गौरव गिल यांच्यामध्ये चुरस दिसून आली. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने गौरव गिलने पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळविले, तर दुसऱ्या दिवशी गौरवनेच पुन्हा वर्चस्व राखत पहिल्या फेरीचे विजेतेपद मिळविले. त्याने सदर स्पर्धेचे अंतर एक तास २८ मिनिटे ३० सेकंदात पार करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला. अमितरजित घोष - अश्विन नाईकची जोडी दुसऱ्या स्थानी राहिली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अल्फा, बिटा आणि ग्यामाच्या प्रत्येकी दोन, तर रविवारी सकाळी पुन्हा या तीनही स्टेजेसची प्रत्येकी एक फेरी झाली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे गौरव गिलने वर्चस्व राखले. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्त्यावरून वेगात गाडी हाकणे धोकादायक होते. तरी कोणतीही दुर्घटना वा गाडीला अपघात झाला नाही. हॉटेल गेट वे येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रंगला. यावेळी विजेत्यांना चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आली. विजेत्यांनी शॅपेन उडवून विजयोत्सव साजरा केला.
यावेळी कठीण गेले : गौरव गिल
स्पर्धेसाठी वापरलेली महिंद्रची गाडी पहिल्या गाडीपेक्षा वेगळी होती. त्यामुळे रुळायला जरा वेळ लागला पण मजा आली. स्पर्धेतील स्टेजेसही गेल्यावेळेपेक्षा कठीण वाटल्या. पण रॅलीत मजा आली आणि आनंद घेतला. सर्वोत्कृष्ट रॅलींपैकी ही एक रॅली आहे.
स्पर्धेचा निकाल :
सर्वसाधारण अव्वल : गौरव गिल/मुसा शरीफ, द्वितीय : अमितरजित घोष/अश्विन नाईक, तृतीय : बेराम गोदरेज/ए.जी. सोमय्या
२००० सीसी गट : बेराम गोदरेज/ए.जी. सोमय्या (प्रथम), राहुल कंथराज/विवेक भट (द्वितीय), सुमीत पंजाबी/वेणूरमेश कुमार (तृतीय) १६०० सीसी गट : ऋषिकेश ठाकरसी/निनाद मिरजगावकर (प्रथम), शिरिष चंद्रन/निखिल पै (द्वितीय), धु्रव चंद्रशेखरन्/बी. रुपेश (तृतीय) १६०० सीसी गट : अनिरुद्ध रांगणेकर/अर्जुन मेहता (प्रथम), के.सी. आदित्य/के.एन. हरिष (द्वितीय), पराग धीवर/आदित्य धीवर (तृतीय)